२० हॉटेल्सना टाळे, तर १५० हॉटेल्सना नोटीस अन्न व औषध प्रशासनाची कारवाई / अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स तपासणी मोहीम सुरु / अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर.
हॉटेल्स ची साफ सफाई नसल्यास कार्यवाही करण्याचे ठरवले… |
ग्रामीण बातम्या : मुंबई : मुंबई शहर उपनगरात मागील दोन महिन्यांपासून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्याची मोहीम अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणारी २० हॉटेल्स बंद केली आहेत, तर १५० हॉटेल्सना सुधारणा नोटीस पाठविली आहे.
हॉटेल्सची तपासणी करताना त्रुटी
अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली. अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत अधिकाऱ्यांनी काही प्रसिद्ध हॉटेल्सवरदेखील कारवाईचा बडगा उचलला आहे, तर काही ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हॉटेल्सची तपासणी करताना त्रुटी आढळल्यानंतर त्यांचे काम थांबवून सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. याविषयी, अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले, सुधारणा नोटिसा बजावलेल्या हॉटेलांना त्यांच्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात येतो.
Related News : पेट्रोल पंपावरील सुविधा जाणून घ्या .
मुंबईकरांकडून हॉटेल्समध्ये जेवण करण्याचे, ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू नये यादृष्टीने ही मोहीम महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भोजनालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव
शहर उपनगरातील बहुतेक रेस्टॉरेंट्स, हॉटेल किवा भोजनालयामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. घाणेरडे स्वयंपाकघर, उघड्या कचराकुंड्या, शिळे अन्न शिवाय कर्मचारी टोपी आणि हातमोज्यांशिवाय काम करतात अशा अनेक गोष्टी दिसून आल्या, हे अन्न सुरक्षेविरोधात आहे. त्यामुळे ही मोहीम वर्षाखेरीसपर्यंत सुरू राहणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.