आता रामाच्या नावाने सुरु झालेला लेटेस्ट सायबर फ्रॉड

आता रामाच्या नावाने सुरु झालेला लेटेस्ट सायबर फ्रॉड
आता रामाच्या नावाने सुरु झालेला लेटेस्ट सायबर फ्रॉड 

सध्या देशभर अयोध्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची धूम सुरु आहे. त्यासंदर्भात विविध सोशल प्लॅटफॉर्मवर लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी लोकही उतावीळ आहेत. आणि नेमकी लोकांची हीच मानसिकता ओळखून सायबर भामटे मंडळींनी नवीनच एक सापळा रचला आहे. त्यापासून चार हातच काय पण चार हजार किमी लांब राहा रे बाबानो ! तुम्हाला सावध करण्यासाठीच या सापळ्याविषयी सांगतोय. 

नेमका काय आहे सापळा ?

तर तुम्हाला एखादा मेसेज येतो अन त्यातून तुमचा फोन हॅक होतो. 

तर ते मेसेज विविध शब्दरचनेचे असू शकतात. विविध आवाहनाचे असू शकतात. त्याची झलक सांगतो. 

१) तुम्हाला राम मंदिर संदर्भात लेटेस्ट हालहवाल (अपडेट्स) जाणून घ्यायचे असतील तर सोबतच्या लिंकवरून आमचे अमुक तमुक APK app डाउनलोड करा. मग तुम्हाला लेटेस्ट अपडेट दररोज येत राहतील. 

२) मंदिर निर्माण कार्यात तुम्हाला देणगीरूपाने सहभागी होऊन पुण्य कमवायचे असेल तर आमचे अमुक तमुक एपिके अँप डाउनलोड करा. आणि नंतर तिथे असलेल्या लिंकवरून ऑनलाईन पेमेंट पाठवा. (ज्याची रिसीटही तुम्हाला ऑनलाईन येईल)

३) मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून भक्त येणार आहेत. तर त्यांच्या अयोध्येतील राहण्याजेवण्याची सेवा आम्ही देतोय. मात्र त्यासाठी निधी कमी पडतोय, तरी आपण यामध्ये सहभागी होऊन जमेल तितकी देणगी द्यावी. त्यासाठी आमचे अमुक तमुक एपिके अँप डाउनलोड करा. 

अशा विविध कारणाने तुम्हाला यामध्ये भावनिकरीत्या गुंतवले जाते. आणि तुम्हीही “देवाचे काम आहे” असं म्हणत फारशी कसली खात्री न करून घेता त्यांनी सांगितलेले अँप डाउनलोड करता. आणि ऍक्टिव्हेट करता आणि तिथेच तुम्ही त्या सापळ्यात स्वतःहून जणू अडकले जाता. कारण त्या अँपमधेच हिडन व्हायरस असतो जो तुमच्या फोन मध्ये घुसतो आणि मग तुमच्या फोनमधील डेटा भामटेलोक त्या मदतीने चोरतात. डेटा म्हणजे अगदी तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट जरी धरली तरी त्यांना ती फायद्याची असते. कारण टेलीमार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना असा डेटा लागतच असतो. त्यांना हा डेटा हॅकर लोक पुरवून पैसे कमवतात. कधी कधी तुम्हाला मार्केटिंगचे कॉल येतात न ? तेव्हा प्रश्न पडतो न की त्यांच्याकडे तुमचा नम्बर गेलाच कसा ? तर तो अशा रीतीने पण गेलेला असतो. 

शिवाय मोठा धोका म्हणजे तुमची फोटो गॅलरी चोरीला जाऊ शकते आणि त्यातले तुमचेच फोटो नंतर मॉर्फिंग करून (म्हणजे चेहरा तुमचा बाकी शरीर भलत्याचेच आणि तेही भलत्याच अवस्थेतले असे जोडणे) आणि मग तो फोटो तुम्हालाच नंतर पाठवून “हा फोटो सोशल मीडियावर आम्ही व्हायरल करू नये असं वाटत असेल तर पाच हजार रूपे अमुक नंबरवर पाठवा !”

तुम्ही हादरता आणि थोडक्यात सुटलो असं म्हणत इज्जत राखण्यासाठी पाच हजार पाठवून देता. हुश्श करता पण दोन चार दिवसांनी दुसऱ्याच नम्बरवरून तोच फोटो पाठवून पुन्हा दहा हजार ची मागणी केली जाते अन तुम्ही असेच मग गाळात रुतत जाता आणि काही काळाने कळत की एक दोन लाखाला चंदन लागला आहे. 

हेही वाचा : सायबर फसवणूक झाल्यास तक्रार कुठे अन् कशी कराल? सविस्तर वाचा.

तिसरा सर्वात मोठा धोका म्हणजे अशा अँप मध्ये कदाचित क्लोनिंग व्हायरस असू शकतो. त्यामुळे तुमच्या फोनचे क्लोनिंग होऊन हॅकरकडे तुमच्या फोनचा सगळा ऍक्सेस जातो आणि मग तुम्हाला आलेले कॉल / मेसेज त्याला मिळतात. इतकेच नव्हे तर तुम्ही इकडे कुणाला तरी शंभर रुपये पाठवले तर त्याची सगळी प्रोसेस तिकडे त्या भामट्याला दिसते. म्हणजे अगदी तुमच्या जी पे चा पिन काय, पासवर्ड काय इथपासून आता बँकेत बॅलन्स किती ? हे सगळं त्याला कळत अन तुमचं ट्रॅन्जेक्शन झाल्या झाल्या दुसऱ्या मिनिटात तो तुमचं खाते साफ करतो अन तुम्ही टेन्शनमध्ये येता !

तर असा हा नवीन फ्रॉड आहे. मग यावर उपाय काय ?

डॉ. डीडी क्लास : उपाय फार सोप्पा आहे. एक म्हणजे शक्यतो अशा अँपच्या नादीच लागू नका. तुम्हाला इच्छाच झाली देणगीची किंवा अपडेट जाणून घेण्याची तर त्यासाठी मंदिर समितीची अधिकृत वेबसाईट शोधा आणि तिथं हवे ते अपडेट घ्या की ! 

शिवाय सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. आता मंदिर काम या टप्प्यावर आहे की निधीची गरज नसल्याचे वारंवार जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उगीच भावनिक होऊन पैसे बिसे पाठवत बसू नका. तुम्हीच गोत्यात याल. वाटलं तर घराजवळच्या राम मंदिरात स्वतः जाऊन तिथं देणगी द्या. ती अयोध्येच्या प्रभुपर्यंत नक्की पुण्याई मार्गे पोचेल. किंवा जे कुणी अयोध्येला निघालेत त्यांना तहानलाडू भूकलाडू करून बांधून द्या. जे त्यांना प्रवासात कामाला येतील अन प्रभूही तुमच्या या सेवाकार्यावर प्रसन्न होईल. विचार करा अन सावध व्हा !

©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे.(dd)

ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !