नाश्ता करावा की करुच नये?, नाश्ता करुनही नुकसानच करतात.

नाश्ता करावा की करुच नये?, नाश्त्याला तुम्ही काय खाता, या ५ चुका – नाश्ता करुनही नुकसानच करतात…..

नाश्ता करावा की करुच नये?,
Morning Breakfast 

नाश्ता करणं, कसा किती करणं आणि करणं की न करणं याविषयी सतत काही ना काही चर्चा सुरु असतात. व्हॉट्सॲपवर पोस्ट येतात. त्यात उलटसुलट माहिती मिळते. आणि अनेकींना तर एक प्रश्न कायमच छळत असतो की आज नाश्त्याला काय करायचं?

नाश्ता म्हणजे सकाळची न्याहारी. ब्रेकफास्ट. रात्रीपासून उपाशी असलेली पोटाची स्थिती तोडून काहीतरी खाणं या अर्थानं ब्रेकफास्ट. पूर्वी पेज,मेतकूट भात, आटवल, कढण, गुरगुट्या भात, तूप, मीठ, असं खायची पद्धत होती. पण आता हे पदार्थच कालबाह्य झालेत! जंक फूडचा वापर खूप वाढलाय. अनेकजण रोज सकाळी सकाळी ब्रेडसोबत एक तर गोडमिट्ट जॅम नाहीतर मग आंबट सॉस खाल्लं जातं. दोन्ही तितकंच घातक. बऱ्याच सधन घरांमधून फॅशन किंवा स्टाइल स्टेटमेण्ट म्हणून ‘कॉन्टिनेण्टल ब्रेकफास्ट’ ही संकल्पना रूढ झालीय.

नास्त्यात यात प्रामुख्यानं ब्रेड, बाजारात मिळणारे तयार सिरिअल्स, कोणतातरी फळांचा एखादा ज्यूस, भारतीय काहीतरी पाहिजे म्हणून पोहे, उपमा, पुरीभाजी, इडली, डोसा वगैरे पैकी एक डिश, बिस्किट्स, केक, मफीन असा गोड पदार्थ आणि शेवटी चहा किंवा कॉफी असा हा प्रकार आहे. म्हणजे एकाचवेळी साधारण अर्ध्या तासात शिजलेले, भाजलेले आणि कच्चे, असे सगळे पदार्थ, ज्यूस, चहा/कॉफी असे दुधाचे पदार्थ असं एकावर एक खात राहणं. कोणालाही समजेल की हे चुकीचं आहे. 

मग नक्की नाश्ता करावा कसा अन् कधी…?*

खरंतर नाश्ता करावा की नाही याचा सरसकट काही नियम नाहीये. पण ही पद्धत सुरु झाली ती मुळात आपल्या दुपारच्या जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे. जेवणाच्या वेळा खूप उशिराच्या व्हायला लागल्या म्हणून नाश्ता केला जाऊ लागला. जर दोन वेळाच जेवायचं किंवा खायचं असा नियम असला आणि रात्रीचं जेवण समजा दहा वाजता घेतलं आणि दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण दोन तीन वाजता होत असेल तर दोन जेवणाच्यामधील अंतर खूपच मोठं होतं. म्हणजे साधारण चौदा तासांचं. आणि यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं. ॲसिडिटी, डोकेदुखी, रिकाम्या पोटी होणारे वेगवेगळे जंतूसंसर्ग, चिडचिड. या गोष्टी दोन जेवणातल्या मोठ्या अंतरानं होतात.

त्यामुळे साधारणपणो घराघरांत सकाळी नाश्ता करण्याचा नियम पाळला जाऊ लागला. आपलं शरीर निसर्गसोबत, एक जैविक घड्याळ्यानुसार (बायोलॉजिकल क्लॉक) काम करत असतं. तुम्ही रोज सकाळी नऊच्या सुमारास खात असाल आणि हा दिनक्रम नेहमीच नियमित असेल तर त्यावेळी बरोबर भुकेची संवेदना होते. खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीनं पचतं आणि दुपारच्या जेवणाच्या वेळी पुन्हा व्यवस्थित भूक लागते.

रूग्णांशी बोलताना काही मजेशीर गोष्टी समोर येतात. मी अशा अनेक स्त्रिया बघितल्या आहेत की त्या सकाळचं खाणं अकरा वाजता, दुपारचं जेवण तीन वाजता आणि रात्रीचं जेवण पुन्हा अकरा वाजता करतात. घरच्या कामांमध्ये वेळच मिळत नाही हे कारण सांगितलं जातं.

नाश्ता करणार असाल तर…

१. नाश्ता करायचा असेल तर त्याची एक नियमित आणि व्यवस्थित वेळ हवी. आणि ती रोज पाळायला हवी.

२.खाण्याचे पदार्थ आणि त्यांचा क्रम हेही विचारात घ्यायला हवं. उगीचच सकाळच्या वेळी पोटाला तडस लागेल इतके पदार्थ एकावर एक खाणं चुकीचंच आहे.

३. पेज, मऊ भात, आटवल, कण्हेरी, कढण हे पदार्थ नाश्त्याला खाणं उत्तम ! ते आता कोणी करत नाही पण निदान तळलेले, गोडाचे, आंबट, दुधाचे असे सगळे पदार्थ एकत्र तरी खाऊ नयेत.

४. पोहे, उपमा, शिरा असा एखादा पदार्थ थोड्या प्रमाणात खावा. म्हणजे दुपारी जेवायला कडकडीत भूक लागेल.

५. उगीचच सवय म्हणून, स्टाइल म्हणून नाश्त्यानंतर चहा, कॉफी, दूध घेतलंच पाहिजे असं काही नियम नाही. नाश्ता आणि त्याच्या योग्य पचनापुरतं पाणी इतकं असलं म्हणजे पुरे!

शरीराची गरज आणि मागणी काय…?

आपलं स्वास्थ्य टिकवायचं असेल, दीर्घकाळ निरोगी राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीनं आपली आवड न बघता, आपली गरज ओळखून, शरीराची मागणी लक्षात घेऊन नाश्ता करायचा की नाही हे ठरवायला हवं. आणि करायचा असेल तर तो प्रमाणात, पथ्यकर पदार्थांचा हवा.

लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, खेळाडू,तसेच गर्भवती स्त्रिया यांनी मात्र दिवसातून कमीतकमी तीन वेळा मोठे मिल्स घेणं गरजेचं असतं, त्यामुळे त्यांना हे कोणतेही नियम लावू नयेत. उलटपक्षी त्यांनी नाश्ता, दोन वेळचं जेवण, फळं, दूध यांचा वेळोवेळी वापर करुन स्वास्थ्य टिकवावं.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *