२४ मे २०२३ रोजी शेतकऱ्यांनी टोमॅटो भाव नसल्याने फेकून दिल्याची छायाचित्रे मी fb वर शेयर केली होती. ही गोष्ट अवघी दीड महिन्यापूर्वीची आहे. गेली आठ दहा दिवस टोमॅटो महाग झाल्याच्या बातम्या, व्यंगचित्रे, मिम,रिल्स यांना ऊत आला आहे. भरपूर मनोरंजन होत आहे.
हितसंबंध कसे असतात बघा, आज शहरी मध्यमवर्ग ते श्रीमंत चित्रपट अभिनेते, टोमॅटो महागले म्हणून बोंब मारीत आहेत. स्वाभाविक ज्याला त्रास होतो तो बोलणारच. जरूर बोला. लिहा. ओरड करा. तुमचे दुःख खरेच आहे.
पण दीड महिन्यापूर्वी किती जणांना शेतकरी वर्गाची व्यथा भिडली होती? किती जण हळहळले होते? तेव्हा एकाने तरी मिम्, रील्स, व्यंगचित्रे काढली होती का?
तुमचेही बरोबरच आहे म्हणा. माणूस एकवेळ ऑक्सीजन, पाणी, औषधे यांच्याविना जगू शकेल. पण टोमॅटोविना जगणे शक्यच नाही. कांदा महागला, टोमॅटो महागले, भाज्या महागल्या प्रचंड अर्डाओरडा स्वाभाविकच. मग सरकारी हस्तक्षेप. परदेशातून आयात.
बघा ना मल्टीप्लेक्समध्ये गेलं की तिकीटाला पंधरा रुपये पडतात तर
मक्याच्या लाह्या ( पॉपकॉर्न) दहा रुपयाला मिळतात. समोसे, बटाटे वडे, चहा अवघ्या पाच रुपयात मिळतो. मग टोमॅटोसुद्धा पाच रुपये किलोने का मिळू नयेत म्हणतो मी? शहरी विचार अगदी रास्तच आहे.
पण जेव्हा बाजार पडतो तेव्हा ही संवेदनशिलता कुठे जात असेल बरे? : प्रा. हरी नरके