मनरेगा अंतर्गत शेततळे योजना.

समुद्रातली मासेमारी ते शेततळ्यातला मत्स्त्यव्यवसाय व्हाया मनरेगा.

मनरेगा अंतर्गत शेततळे.
मनरेगा अंतर्गत शेततळे. दत्तू ठाकरे.

“नमस्कार, मी दत्तू ठाकरे, पालघर जिल्ह्यातल्या दोल्हारी बु. या आदिवासी गावात मी राहतो. माझी ५ एकर जमीन आहे पण आम्ही भाताशिवाय दुसरं कोणतंच पीक घेत नव्हतो. त्यामुळे भाताचा सीजन संपला की आम्ही १८, १९ वर्षांचे गावातले सगळे तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई, सूरत सरख्या शहरांमध्ये स्थलांतरीत व्हायचो.

कोणी मजुरी करायचं तर कोणी मासेमारीच्या बोटीवर कामाला लागलायचं. मी सुद्धा सातपाटी बंदरवरून मासेमारीसाठी समुद्रात जायचो ज्याचे मला वर्षाकाठी ६००० रुपये मिळायचे. 

एकदा असंच मासेमारीसाठी दूर समुद्रात असताना आमच्या बोटीची मशिन बंद पडली. चार पाच दिवस समुद्रात इथं तिथं भरकटत राहिलो. जवळचं सगळं खाणं आणि पाणी संपलं होतं.

जीव वाचण्याचे काहीच मार्ग दिसत नव्हते. आता आपल्याला इथंच मरण येणार आणि घरच्यांना कळणारही नाही. असा विचार करून करून दिवस ढकलत होतो. एका बेटावर अडकलो.

कोणी रडत होतं तर कोणी उदास बसून राहायचं. काही दिवसांंनी नेव्हीच्या लोकांनी आम्हाला वाचवलं आणि आम्हाला मुंबईत भाऊच्या धक्क्यावर सोडलं. मी घरी आलो तेव्हा घरात मरणकळा पसरली होती. माझी आई धाय मोकलून रडायला लागली तिला वाटलेलं तिचा मुलगा मेला. 

त्यानंतर मात्र मी गाव सोडून गेलो नाही. आता माझा मुलगा विकास आणि मी मिळून इथं शेती करतो. २०११ मध्ये कृषी विभागातून आम्हाला विहीर मंजूर झाली. त्या विहीरीच्या पाण्यावर पावसाळ्यानंतर आम्ही भाजीपाला घेतो.

विहीरीच्या जोरावर कलिंगड घेतलं आणि स्वतः बाजारात नेऊन विकलं. मात्र १७ फूट असलेल्या या विहरीचं पाणी दिवाळीनंतर आटत जायचं आणि संपूर्ण उन्हाळा खडखडाट असायचा.

म्हणून गावातले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाबू मोरे सर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी मार्गदर्शन केलं. माझा मुलगा विकास आणि मोरे सर यांनी प्रयत्न केल्यामुळे २०२१-२२ मध्ये मी जवळपास १३ गुंठे जागेत ३०x३० चं शेततळं बांधलं. 

शेततळ्यातलं पाणी मी पावसाळ्यानंतर शेतीसाठी वापरणार आहे. तसंच शेततळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मासेही सोडले आहेत. माझं मासेमारीचं ज्ञान मी आता इथं वापरतोय.

शेततळं बांधलं त्या १३ गुंठे जागेत. मला फारतर ५००० रुपयांचं भात मिळालं असतं. पण आता शेततळ्यात सुरू केलेल्या मस्त्यव्यवसायाने आणि त्या पाण्यावर करता येणाऱ्या चवळी, गवार, कलिंगड यांसारख्या पिकांमुळे मला भातापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी खात्री आहे.

माझी तिन्ही मुलं शिक्षण घेत आहेत. मोठा मुलगा विकास MSc च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मी आणि माझी बायको शिकलो नाही पण मुलांना शिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. त्यात मनरेगासारख्या योजनांचा आम्हाला पाठींबा मिळत आहे.”

– दत्तू ठाकरे

गाव – दोल्हारी बु. 

ता. विक्रमगड

जि. पालघर

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !