रस्त्यासाठी विहिरीतील दगडयुक्त खडीचा वापर.
Rural News : शिरपूर, (वा.) तब्बल दहा वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या भिलटपाडा- जामण्यापाडा या दोन गावांना जोडणाऱ्या रस्ता दुरूस्तीचे काम केले जात आहे. सुमारे दिड कि.मी. रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असून रस्ता बांधकामात विहीर खोदकाम करतांना निघालेल्या दगडाची खडीचा वापर केला जात आहे. यारस्ते कामाची गुणवत्ता संदर्भात ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्तेकामाच्या भ्रष्टाचारासंदर्भात इडीतर्फे चौकशीची मागणी केली जात आहे.
शिरपूर शहरापासून भिलटपाडा– जामण्यापाडा हे गाव ३५ कि.मी. अंतरावर असून ते आदिवासी क्षेत्रात येते. गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दुरावस्थेत असलेल्या रस्तेकामाच्या दुरूस्तीसाठी मंजुरी मिळाली. मात्र दुरूस्तीचे होत असलेले काम पाहता पंधरा दिवसातच रस्त्याची अवस्था जैसे थे होईल असे दिसून येत आहे.
यासंदर्भात आ.अमरिशभाई पटेल यांनी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश दिले असले तरी रस्ता दुरूस्तीत नियम पायदळी तुडवल्याचे जात आहेत. विहिरी खोदकामातून निघणारी दगडयुक्त खडीचा वापर रस्ते कामासाठी होत असून गुणवत्तेकडे बांधकाम विभाग व ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
आदिवासी क्षेत्रातील अनेक रस्ते दुरावस्थेत असून करोडोंचे काम काही लाखात करत असल्याचे चित्र आहे, याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तालुक्यातील कोणतेही सार्वजनिक काम ठेकेदार अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट होत असल्याची ओरड नेहमीच नागरिक करत असले तरी याची चौकशी वा कारवाई केली जात नाही.
विकासाचे मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळवलेला शिरपूर तालुका रस्ते भ्रष्टाचाराच्या कामात प्रथम क्रमांकावर येईल, असे वास्तव दिसून येत आहे. तालुक्यातील या रस्ते कामांची थेट ईडीकडूनच चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शिरपूर शहरापासून भिलटपाडा- जामण्यापाडा येथील रस्ता |