राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची व विधिमंडळ अधिवेशन त्वरित बोलावण्याची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मागणी.
राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची. |
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच अतिवृष्टी व पूरामुळे शेतजमिन आणि पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे,
अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी केली आहे. यासंदर्भात अजितदादांनी मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले असून राज्यात झालेल्या नुकसानीची गंभीरता राज्य शासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
सततच्या पावसामुळे पीके वाहून गेली असून शेतीसाठी वापरण्यात आलेले बियाणे, खते यांचे नुकसान झालेले आहे.
आजपर्यंत १०० पेक्षा जास्त व्यक्तींचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे अद्यापपर्यंत पंचनामे होऊ शकले नाहीत. शहरी भागातील तसेच विशेषत: ग्रामीण भागातील रस्ते अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत.
अतिवृष्टीमुळे विशेषकरुन ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण व एकंदरित ऊर्जा विभागामार्फंत तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या परिस्थितीमुळे दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळे, पालकमंत्री नसल्याने यंत्रणेला दिशा देण्याचे काम होऊ शकत नाही.
पूर्वीच्या शासनाने १८ जुलैला पावसाळी अधिवेशन घेण्याचे निश्चित केले होते. परंतु नवीन सरकार आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींमुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे गेले आहे.
त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्यासह या मुद्द्यांवर विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे अजितदादा पवार यांनी मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.