बांबूच्या झोळीत प्रसूतीकळा सोसत सहा किमीची पायपीट शिरपूर तालुक्यातील थुवाणपाणी येथील वेदनादायी घटना.
( तालुका शिरपूर) : तालुक्यातील गु-हाळपाणी ग्रुपग्रामपंचायतीतील थुवाणपाणी गावात येथील एका महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. परंतु रस्त्याची सोय नसल्याने महिलेला बांबूची झोळी करून सहा किलोमीटर अंतरावरील गुन्हाळपाणी येथे नेण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. या महिलेला आता वकवाड आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. याठिकाणी प्रसूती झाली असून बाळ आणि बाळंतीन सुखरूप आहेत.
शिरपूर तालुक्यातील उत्तरेला मध्यप्रदेश सीमेवरील दुर्गम डोंगराळ क्षेत्रात गुन्हाळपाणी ग्रुपग्रामपंचायत असून त्याअंतर्गत युवाणणी व निशाणपाणी या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. शनिवारी या गावातील लालबाई मोतीराम पावरा (३४) यांना प्रसूतीकळा येऊ लागल्याने तिला बांबूची झोळी बनवून निशाणपाणी ते थुवाणपाणी आणि तेथून गुन्हाळपाणी असे.
६ किलोमिटरचे अंतर पायपीट करत आणले. त्यानंतर तेथून या महिलेला रुग्णवाहिकेने वकवाड येथील प्राथमिक आरोग्य चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या केंद्रात दाखल केले. तिची सुरक्षितरित्या प्रसूती होऊन बाळ झाले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गुलबा पावरा, सिकना पावरा, कावसिंग पावरा, आशा सेविका सुरमीबाई पावरा, सतीलाल पावरा यांनी या महिलेला झोळीने आणण्यास सहकार्य केले.
चार महिण्यापुर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना देखील थुवाणपाणीपर्यंत पायी यावे लागले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना रस्त्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही रस्त्याबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.
अन् आता पुन्हा तीच वेळ.
१४ मे २०२० रोजी अशाच प्रकारची घटना थुवाणपाणी येथे घडली होती. त्यानंतर १५ मे २०२० रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी गुहाळपाणी येथे येऊन एका दिवसातच एक डॉक्टर व नर्सची नियुक्ती करून हा प्रश्न सोडवला होता. त्या घटनेला तीन वर्षे उलटली तरीही थुवाणपाणी व निशाणपाणी येथे रस्त्याची सोय झालेली नाही.
गुन्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत दहा ते बारा खेडी येतात. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची मागणी करत आहोत. मात्र याबाबत कोणीही गांभीर्य घेतलेले नाही.- राजेंद्रसिंग पावरा, माजी ग्रामपंचायत सदस्य, गुन्हाळपाणी