शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवल्याचा आरोप.

हिंगोणीपाडा पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करा : बिरसा फाईटर्स.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवल्याचा आरोप.

शिरपूर : तालुक्यातील हिंगोणीपाडा येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून ते आज पावेतो शिष्यवृत्ती दिली नाही. विद्यार्थ्यांच्या बनावट सह्या करून मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी विद्यार्थी व पालक यांना अंधारात ठेऊन शिष्यवृत्तीचे लाखो रुपये परस्पर आपल्या खात्यात वर्ग करून भ्रष्टाचार केलेला आहे.

शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थांना वंचित ठेवण्यात आले आहे. म्हणून हिंगोणीपाडा येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे कि, बिरसा फायटर संघटनेचे पदाधिकारी दि. ०४/०९/२०२३ रोजी सदर विद्यालयात भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केली. एकीकडे शिरपूर तालुका महाराष्ट्रात शिक्षणाचे दुसरे माहेर घर म्हणून ओळखले जाते. परंतु दुसरीकडे शिरपूर तालुक्यात शिक्षणाच्या नावाखाली शासनाची व विद्यार्थांची दिशाभूल केली जात आहे.

पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय हिंगोणीपाडा ता. शिरपूर जि. धुळे येथील शाळेत एकूण १२ कर्मचारी पटावर आहेत त्यापैकी फक्त पाच कर्मचारी शाळेत हजर होते. एकूण विद्यार्थी २६१ पटावर असून इयत्ता ५ वी १० विद्यार्थी, ६ वी ०८ विद्यार्थी, ७ वी ०७ विद्यार्थी, ८ वी ०५ विद्यार्थी, ९ वी ० विद्यार्थी व १० वी ०३ विद्यार्थी असे एकूण फक्त ३३ विद्यार्थी शाळेत हजर होते. विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली असता माध्यमिक वर्गातील मुलांना बोलता – वाचताही येत नाही. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला मराठीत नाव वाचता येत नाही, विद्यार्थ्यांकडे वह्या – पुस्तके नाहीत, तसेच गणवेशही नाहीत.

सदर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे व मूलभूत सुविधांकडे तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत भ्रष्टाचार झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन दोषींना सेवेतून काढण्यात यावे. व आर्थिक अपहार केल्याप्रकरणी मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. 

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे व्याजासकट त्यांना परत करण्यात यावेत व गैरहजर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देण्यात येऊन विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात यावी अन्यथा येत्या काही दिवसात संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदन देते वेळी संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स सुशीलकुमार पावरा, विभागीय अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, ज्ञानेश्वर मोरे आदी उपस्थिती होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *