गेल्या पस्तीस वर्षांपासून गावातील बिनविरोध निवडणुका, पूर्ण गावात बंदिस्त सांडपाणी व्यवस्था, शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी फिल्टर प्लॅट, डिजिटल शाळा, घरोघरी शौचालय आणि संपूर्ण गावातील कॉक्रिटीकरण असलेले अंतर्गत रस्ते आदी गोष्टी अभिमानाने मिरविणाऱ्या मावळ तालुक्यातील पुसाणे गावाला आता सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले गाव म्हणून मान मिळणार आहे.
सध्या या गावामध्ये भव्यदिव्य असा सोलर सीस्टिम प्रकल्प कार्यान्वित होत असून, त्यामुळे पुसाणे गावाची विजेची समस्या पूर्णपणे सुटणार आहे.
असे आहे पुसाणे गाव
■ पुसाणे गावची लोकसंख्या १,५०० आहे. ग्रामस्थांनी २० लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा केले. उर्वरित रक्कम विदेशी कंपनीने दिली.
■ प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यास आठ महिन्यांचा काळ लागला.
■ पावसाळ्याच्या दिवसांत वीज नसल्याने गावाची गैरसोय व्हायची.
सोलर सीस्टिम प्रकल्प.
तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष व पुसाणे गावचे सुपुत्र किशोर आवारे, सरपंच संजय आवंढे यांच्या प्रयत्नांतून व एका नामांकित कंपनीच्या सीएसआर फंडातून गावामध्ये सोलर सीस्टिम प्रकल्प उभारण्यात आला आहे.
२४ तास वीजपुरवठा
त्यापासून रोजची चाळीस किलोवॅट वीजनिर्मिती होणार असून, त्यामुळे गावातील रस्त्यावरील लाइट, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिरे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा योजनेच्या मोटारींसाठी २४ तास वीजपुरवठा होणार आहे. भविष्यात गावातील कुटुंबांनाही वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.