तालुक्यातील शहा येथील 17 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट वावी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. वैभव विलास गोराणे (१८), अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी नवनाथ जाधव असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ती शहा गावातील श्री भैरवनाथ हायस्कूल येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता.
या तिघांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट साईट सांगून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली होती. संशयित आरोपी वैभव गोराणे याने त्याच्या मित्रांबरोबर वैष्णवीच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी करत गच्ची पकडली. त्यानंतर वैष्णवीला तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो, अशी धमकी देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. यानंतर वावी पोलिसांनी संशयित वैभव गोराणे आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता वैष्णवीच्या वडिलांची फिर्याद पोलिसांनी वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर व एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तोपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारात होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात शहा येथे सायंकाळी वैष्णवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते पुन्हा त्रास देतील आणि वडील पुन्हा मारतील..
वैष्णवीने आत्महत्या केली, त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते.
हेही वाचा : पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यास. लिंक
माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
लेगीजचाच दोर करीत गळफास
ग्रामस्थांनी भांडण सोडवत मुलांना समज दिली होती. तिघे जण गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे व शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबियांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिने शाळेच्या गणवेशातील लेगीज पॅन्ट फाडून दोरी बनवली व घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला.