Breaking News | देशांतील वर्तमान राजकीय स्थितीचे अवलोकन..

ब्रेकिंग न्यूज – देशातील वर्तमान राजकीय स्थितीचे अवलोकन करताना काही बाबी गांभीर्याने लक्षात घेतल्या पाहिजेत, भारत देश जगातील सर्वात चांगली लोकशाही असलेला देश आहे.आपण मोठ्या दिमाकाने गौरवतो, राजकीय सत्तेशिवाय या देशाचा राज्यकारभार चालू शकत नाही,असं असले तरी वर्तमानामध्ये जी काही राजकीय स्थिती आहे तिचे अवलोकन करणे गरजेचे आहे .

भारतीय समाज जीवनाच्या संदर्भात त्यातील अंतर कमी जास्त पायाभूत म्हणूनच या महापुरुषांनी आपले विचार योजना, संस्था, संघटना आणि प्रत्यक्ष आंदोलने याची मांडणी केलेली आहे ‌हजारो वर्षाच्या जातीव्यवस्थेच्या, वर्णव्यवस्थेच्या परिणामी येथील माणसांची श्रेष्ठ कनिष्ठ, अन्याय, पिळवणूक प्रधान दशहती स्वरूपाची उतंरड मांडण्यात आलेली आहे. 

तिचा सर्वात खाली दबलेला तळ त्यांमध्ये शूद्रातिशुद्र,पददलित,बहुजन समाज आणि त्याला विकासाची संधी सारे मानवी हक्क प्राप्त करून देण्याची समान संधी त्याच्यावर लादलेल्या मागासपणापासून घेण्यासाठी आवश्यक असणारी विशेष हक्क, अधिकार, सवलती त्यांनी आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकास संकल्पनाचा प्रपंच रचला आहे. भारतातील लोकशाही व लोकांचे सौर्वभौमत्व या संकल्पनाचा पाया त्यामधून रचला गेलेला आहे.

भारतातील शोषित, पीडित शूद्रातिशुद्र, बहुजन समाजाला लागलेल्या या अन्याय सामाजिक जीवन व्यवस्थेची त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्रीच्या साह्याने संस्थांना कार्यस्वरूप विरोध होता. लोकशाही या संकल्पनेचा या पद्धतीचा उदय अनियंत्रित लोक राजेशाही व हुकूमशाहीच्या विरोधात झालेला असला तरी ती केवळ आत्मज्ञानिक नकारात्मक स्वरूपातच झाला .याची भूमिका स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही आपले स्वरूप बदलले तरी लोकशाहीचे मूल्य बदलत नाही.

समता, स्वातंत्र्य,बंधुता या तत्त्वावर असते.आधुनिक लोकशाहीचे ध्येय एखाद्याचे अधिकार कमी करणे एवढेच नसून लोकांचे कल्याण साधने हे आहे. मात्र आपण पाहत आहोत की, आज देशातील राजकीय स्थिती कुठल्या दिशेने जात आहे कोणत्या पातळीवर देशाचं राजकारण जात आहे राजकीय सत्तेचे सत्ता संघर्ष सुरू आहे. 

राजकारण एका खालच्या पातळीवर जात आहे. लोकशाहीकडून हुकूमशाही कडे वाटचाल होत आहे. हे आपण आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. या देशातील सुरू असलेल्या वातावरणामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. वाढती गुन्हेगारी,जातीयतेच्या नावाखाली दंगे, फसाद, खून, मारामारी, स्त्रियांवरचे वाढते बलात्काराचे प्रमाण, राजकीय सूड भावनेतून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या देशातील भयावह वातावरण होत आहे. राजकीय विविध पक्षातील नेते हुकूमशाही पसरवत आहे, अशा अनेक घटना प्रसंग,बातम्या रोज कानी पडतात एकंदर सामान्य माणसाचं जगणं आज कठीण होत आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार केला तर ज्या पद्धतीने राजकारण घडवून आले आहेत त्यात ही सत्ता संघर्ष सुरू आहे .एका रात्री जग झोपेत असताना मुख्यमंत्री बनतो,सत्तेच्या गणितामध्ये जो घोडेबाजार आहे आणि जे राजकीय नैतिकता असायला पाहिजे ती कुठल्याही पक्षांमध्ये दिसून येत नाही. लगेच पुन्हा दुसऱ्या सत्ता अस्तित्वात येऊन राजकारण अतिशय वेगळ्या पद्धतीने होत असताना आजचं वातावरण दिसत आहे.

त्यानंतर नुकतेच कर्नाटक मधील जे काही राजकीय गणित झालेले आहेत आणि त्यात धर्माचा उदो उदो करून ज्या पद्धतीने राजकारणात धर्माकारण आणून लोकशाहीची पाळेमुळे खच्चीकरण केल्या जात आहे. काही पक्ष नेते पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची संधी नसल्याने पक्षांतर करताहेत, काही पक्षनेत्यांना विरोधी पक्ष नेते फोडून आपल्या पक्षात घेत आहेत. यावरून असे लक्षात येते की सगळेच राजकीय पक्ष व पक्षातील नेते ही सारखेच.

पण भारतीय लोकशाहीच्या भवितव्याचा विचार केला तर तो व्यापक सकारात्मक पातळीवर करावा लागतो. हे आजच्या राजकीय पक्षातील लोकांना कळते की नाही हा प्रश्न आहे..

सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात,गुन्हेगारीची मदत घेतात, जातीयवादाचं राजकारण करतात, केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी जास्तीत जास्त राजकीय पद भूषविण्यासाठी व टिकवण्यासाठी त्यामुळे पक्षापक्षातील भेद ,असे वातावरण आजचे दिसत आहे.

ही परिस्थिती का निर्माण झाली असावी?हा ही एक चिंतनाचा विषय आहे. याचे कारण एकच सांगता येईल की जो बुद्धिजीवी व शहाणी माणसं राजकारणाबाबत उदासीन झालेली आहेत व अल्प शिक्षित वर्गाकडे व दुर्जनाच्या सक्रियतेमुळे चांगली माणसं राजकारणातून बाहेर फेकल्या गेली. त्यामुळे धर्माध राजकारणाचे वातावरण दिसत आहे.अराजकतेचे वातावरणामुळे जबरदस्तीचे धर्मांतरण सुरू आहे, पक्षांतर सुरू आहे. राजकारणात नेहमीच विविध समाजाच्या लोकांची फसवणूक झालेली आहे 2019 सालच्या निवडणुका जिंकण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा उकरून काढण्यात आला. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवून सत्ता डाव रचण्यात आला. व आज देखील जातीयवाद गंभीर स्वरूपात फोफावत आहे.याचे पडसाद आजच्या वर्तमान स्थितीत दिसत आहे . महाराष्ट्रातील नांदेड येथील अक्षय भालेराव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून हत्या करण्यात आली. 

म्हणजेच आजही धर्मांध राजकारण होत आहे.अतिशय विकोपाला गेलेली मानसिकता या देशातील सत्याधार्‍यांची आहे .अक्षय भालेराव सारख्या किती युवकांची अजून जातीयवादांच्या नावाखाली हत्या होणार आहे ?किती दिवस राजकीय सत्याधारांची जातीयवादातून या देशातील युवकांना आम्ही खांदा द्यायचा असे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपाची दिसून येत आहे. मग कुठे आहे नैतिकता.? हा प्रश्न निर्माण होतो. या लोकशाही असलेल्या देशातील वर्तमान स्थितीला पायबंद लागणे गरजेचे आहे.

लोकशाहीमध्ये राष्ट्रपती हे पद सर्वोच्च आहे .राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू या आदिवासी समाजाच्या आहेत .संविधानात सर्वाधिक अधिकार राष्ट्रपतींचे आहेत तरीही राष्ट्रपती र्मुमू यांना निमंत्रित केले गेले नाही. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळा हा उघड पुरावा आज आपल्याला दिसत आहे, आपण अनुभवतो आहे .आज या देशातील लोकशाही संपविण्याचे काम मनुवादी करीत आहे ?ही चित्र आपल्या पुढे आहे. कारण या देशातील सर्वोच्चपद प्रतीक, राष्ट्रपतीचे आहे ते मग स्त्री असो वा पुरुष असो,देशातील राष्ट्रपतीच्या द्वारे संसद भवनाचे उद्घाटन न करता त्यांना डावलल्या गेले .

म्हणजेच ती लोकशाहीची संसद नसून ती धर्म संसद आहे. राष्ट्रपती असलेला एका स्त्रीचा अपमान करावा म्हणजे समस्त देशवासीयांचा अपमान आहे .म्हणजेच भारताला पुन्हा धर्मार्थ देश बनविण्याचा डाव तर नाही ना, पुन्हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही समाजावर अन्याय, अत्याचार ,शोषण ,हनन चालूच आहे.प्रश्न हा पडतो की लोकशाही नावालाच तर राहिले नाही ना? मग संविधान केवळ कागद पुरतेच आहे का याचं चिंतन सुद्धा होणे गरजेचे आहे.

निरंकुश सरकारवर नियंत्रित व अंकुश ठेवणारा असा प्रबळ विरोधी पक्ष आज देशात नसल्याने सत्ताधारी मनमानेल तसे त्यांचे वागणे सुरू आहे. आणि देशाच्या राजकारणाला देशातील विकासाला, आर्थिक धोरणाला उद्योगाला खिळ बसत आहे .छोटे छोटे उद्योगाला नष्ट करून केवळ मूठभर उद्योगांच्या हातामध्ये या देशातील सर्व आर्थिक सत्ता, उद्योग सोपविण्याचे राजकीय डाव सुरू आहे. असेही आज आपण पाहतोय. खरंतर या देशाची जी वास्तविकता ही जात आहे.

आजही देशात या जाती विना गांव नाही ,देशनिष्ठेपेक्षा, माणसापेक्षा जात, धर्म श्रेष्ठ, ही मानसिकता तयार होत असल्यामुळे आज जी राजकीय स्थिती निर्माण होत आहे ती देशाच्या आणि एकूणच मानवतावादी लोकशाहीवादी देशाला घातक अशी परिस्थिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कष्टाने उभे केलेला हा लोकशाहीचा डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे, भारतीय संविधानाच्या लोकशाहीला जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे आणि हेच आजच्या वर्तमान राजकीय स्थितीवर अवलोकन करताना आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.

प्राचार्य अस्मिताताई दारुंडे (भगत)

हिंगणघाट जि. वर्धा

आंबेडकरी लेखिका, वक्ता

मो.नं.८६६८५०३३०८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !