‘इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे…!’
आपल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा हा शब्द शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नेहमी वापरण्यात येतो. शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. महाराष्ट्र आणि बळीराजा यांचं किती जिव्हाळ्याचं नातं आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्त बळीराजा कोण होता ? कसा होता ? या विषयी थोडीशी माहिती घेऊया.
◆पुराणकथा◆
बळीराजाच्या संदर्भात महाभारत, भागवत, पद्मपुराण अशा विविध ठिकाणी कथा आढळते. पण गोष्ट अशी की प्रत्येक पुराणातील कथा वेगवेगळ्या आहेत. सर्वसामान्यपणे जी कथा सांगितली जाते ती अशी ‘कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणतात. त्या दिवशी बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाते. असुर (राक्षस) यांचा राजा बळी हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजादक्ष होता, दानशूरपणात खूप पुढे होता. त्याची शक्ती खूप वाढली होती. त्याने देव लोकांचा पराभव केला होता. मग विष्णूंनी वामनाचा अवतार घेऊन बळीराजाकडून तीन पावले दान घेतले आणि त्याला पाताळात घातले.’ अशी पुराणात कथा आहे.
◆बळीराजाचे राज्य का यावे वाटते ?◆
पुराणांच्या कथानुसार बळीचे राज्य इतके चांगले होते की सर्व शेतकरी, रयत सुखी होती. राज्यातील सर्वजण अगदी सुंदर जीवन जगत होते. सुख, शांती, समृद्धी अशाप्रकारे बळीचे राज्य होते. राज्यांमधील जी संपत्ती होती त्याची त्याने न्यायपद्धतीने विभागणी केली होती. त्याला संविभागी राजा असंही म्हटलं जातं ते यामुळेच. जनता समाधानी असते, कोणावरही अन्याय होत नाही त्या राज्याला सुखी नाही तर काय म्हणावे? तसेच बळीच राज्य होते. त्यामुळे आजही बळीचे राज्य यावे ही शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची अपेक्षा असते.
◆जगद्गुरू संत तुकाराम महाराज“◆
“हरी तूं निष्ठुर निर्गुण ।
नाहीं माया बहु कठिण ।
नव्हे तें करिसी आन ।
कवणें नाहीं केलें तें ॥
बळी सर्वस्वें उदार ।
जेणें उभारिला कर ।
करूनि काहार ।
तो पाताळीं घातला ॥”
हरी तू निष्ठुर, कपटी आहेस. तुझ्यात चांगला गुण नाही. तुला थोडीही दया-माया नाही. दुशमणातील दुश्मन करणार नाही अशी कृत्ये तू केलीस. बळी सर्व दृष्टींनी चांगला, आदर्श किंवा उदार राजा होता. दान देण्यासाठी त्यांनी हात वर केला परंतु कपट करून त्याला तू पातळात घातलेस.
◆तुकयाबंधु कान्होबा◆
“बळीचा अन्याय सांग होता काय ? |
बुडवोनी तो पाय देऊनी माथा ||
कोंडीले दार हा काय कहार ? |
सांगतोसी चितर कथा ||”
◆महात्मा फुले◆
”सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी |
दसरा दिवाळी आठविती ||
क्षेत्रीय भार्या ईडा पीडा जावो |
बळीराज्य येवो का बा म्हणती ?||”
◆बळीच्या स्मृती ◆
आज महाराष्ट्रामध्ये बलिप्रतिपदेला म्हणजेच पाडव्याला बळीची पूजा केली जाते. गाई-म्हशींना, जनावरांना पूजले जाते. कारण बळी संस्कृतीमध्ये शेती, जनावरे यांचे महत्त्वाचे स्थान आहे. तसेच अनेकजण बळी, बळीराजा, बळीराम या नावाची माणसे गावागावात आढळून येतात. बीडपासुन जवळ असणाऱ्या ‘वरवटी’ या गावांमध्ये याचाच भाग म्हणून म्हशीच्या धावण्याची स्पर्धा आयोजित केली जाते, तसेच हल्ल्यांच्या टकरी लावल्या जातात. केरळ राज्यामध्ये ‘ओणम’ नावाचा सण बळीराजाचे आगमन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
Farmer | Baliraja |
◆आजचा बळीराजा◆
बळीराजाला वामनाने पाताळात घातल्यापासून शेतकऱ्यांच्या डोक्यावर छत्र जणू हरपले की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकरी करतो. आज शासन, प्रशासनामध्ये अनेक वामन तयार झाले असून शेतकऱ्यांचा बळी जात आहे. मंत्र्यांचे कारटे शेतकऱ्यांना चिरडून मारत आहेत. शेतकरी आंदोलनाची कोणी दखल घेत नाही. ही खरोखर खेदजनक बाब आहे. तरीही पुन्हा एकदा चांगल्या बळीच्या राज्याची कामना करून म्हणूया …!
“इडा पिडा जाऊदे
बळीच राज्य येऊ दे…..!!”
◆श्रीकृष्ण उबाळे,बीड
◆ मो.9405344642