Nandurbar District | नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन !

नंदुरबार पोलीसांनी केले अपघातग्रस्तांच्या दुःखाचे सीमोल्लंघन !

मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले तर १५ मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बसचालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. गोष्ट इथे संपत नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाज.

ऊसतोडणीचा सिझन सुरु झाला की दसऱ्याचे तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर बाया माणसे..मुले ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात.

चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे.दसरा,दिवाळी,मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढी पाडव्याला गावाला परतायचे.पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत,पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट. 

नंदुरबारचे जिल्हाचे पोलीस प्रमुख.

या भीषण अपघातात कर्ते पुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेडा या गावावर शोककळा पसरली. अशात नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गावात येतात.थेट झोपडीसमोर बसकन मारतात.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांची भाषा.

अपघातात कुणी आई तर कुणी बाप गमावलेला असतो. डझनभर लोक कायमचे जायबंदी झालेले.त्यांच्या मजुरीवर अवलंबून असलेली अनाथ झालेली उघडी वाघडी लहान मुले तर गांगरून गेलेली.झोपडीतले दारिद्र्य,दुःख,दैना पाहून सारेच हेलावून जातात.यंदा इथे दसरा साजरा होणार नसतो. या आदिवासी लोकांची भाषा कुणाला समजत नाही.

समजते ते फक्त त्यांच्या डोळ्यातले दुःख. पोलीस अधिक्षकांचे फर्मान सुटते. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. भापकर हे या साऱ्यांच्या घरात २ महिन्याचा किराणा पोहोच करतात.

पुन्हा फर्मान सुटते या साऱ्या मयत व जखमी लोकांच्या घरी FIR ची प्रत,PM रिपोर्ट,मृत्यू दाखला,पंचनामा, इ. कागदपत्रांची फाईल घरपोच होते.सरकारी मदत आणि विमा रक्कम मिळणेसाठी जलद हालचाल सुरु होते. उचल म्हणून घेतलेले पैसे ठेकेदारांने परत घेऊ नये यासाठी त्याला ‘सूचना’ दिली जाते.

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री.

बसमालकाला बोलावून पोलीसी भाषेत ‘समजावून’ सांगितल्याने तोही या लोकांना आर्थिक मदत करतो. अपघातग्रस्तांचे दुःख हलके केल्यांने एरव्ही कडक वाटणारे पोलीस आदिवासी पाड्यावर देवदूत भासतात. नंदूरबारचे पालकमंत्री डॅा. विजयकुमार गावित,आमदार राजेश पाडवी हे सुद्धा मुख्यमंत्री फंडातून तातडीने मदत मिळणेसाठी पुढाकार घेतात.

नंदुरबार जिल्ह्यातील पोलीसांनी आदिवासी समाज्याच्या मजुरांच्या आगळे वेगळे सीमोल्लंघन.

नंदुरबार पोलीसांनी मात्र अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन ‘माणुसकीचा दसरा’ साजरा केल्यांने त्यांचे कौतुक होत आहे.आदिवासींनीही त्यांच्या भाषेत पोलीसांचे आभार मानले आहेत.दोघांनाही एकमेकांची भाषा समजली नसली तरी परस्परांच्या भावना मात्र नक्कीच कळाल्या असतील.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !