चर्चगेट रेल्वे स्टेशन नव्हे चिंतामणराव देशमुख स्थानक.

आता मुंबई मधील रेल्वे स्थानक चर्चगेट नव्हे _तर “चिंतामणराव देशमुख स्थानक” चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय ~मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

{ अविनाश देशमुख शेवगांव }

*9960051755* 


एका विस्मृतीत गेलेल्या महान भूमिपुत्राचा,असा गौरव करून शिंदेसेनेने आपल्या भावी राजकीय वाटचालीचा मार्ग सुनिश्चित केला आहे.

“संयुक्त महाराष्ट्र आंदोलना”दरम्यान; मुंबईत झालेल्या गोळीबाराविरोधात, जेव्हा _सत्तारूढ काँग्रेस पक्ष गप्प बसला होता_. त्यावेळी, पंडित नेहरूंच्या विरोधात उघड भूमिका घेऊन सी डी देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राचा आवाज बुलंद केला होता.*

अफाट लोकप्रियतेमुळे बेफाट झालेल्या, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना भर संसदेत, मराठी माणसांवरील गोळीबारासाठी आणि मुंबई महाराष्ट्रापासून दूर करण्याच्या छुप्या मनसुब्यासाठी जाब विचारत, चिंतामणराव देशमुख यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदावर लाथ मारली होती.

“अस्सल मराठी बाण्याच्या त्या एका दणक्याने” _उन्मत्त दिल्लीत_ किल्ली फिरली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रचंड बळ लाभले.* अवघा महाराष्ट्र पेटून उठला. चिंतामणराव देशमुख यांच्या राजीनाम्याच्या धाडसी कृतीमुळे आनंदित झालेल्या सह्याद्रीची छाती फुलली चंद्रभागा, कृष्णा, भीमा, वैतरणा, गोदावरीसह तमाम नद्यांना मायेचा पूर आला. *आचार्य अत्रे यांच्या लेखणीला मग कौतुकाची चांदणफुलं आणि जिव्हाळ्याची अमृतफळं लगडली…*

आणि _*अत्रे साहेबांचा भारावलेला “मराठा” सद्गदित आवाजात गर्जला…”चिंतामणी, महाराष्ट्राचा कंठमणी झाला.”*_


रायगड जिल्ह्यातील आजच्या महाड आणि तेव्हाच्या रोहा तालुक्यातील “नाते” गावात जन्मलेल्या, या प्रज्ञावान अर्थतज्ज्ञाने, आपल्या कर्तृत्वाने नेहमीच आपल्या मायभूमीचा लौकिक वाढवला. दहावीच्या परीक्षेत बोर्डात पहिले येणारे, पहिली जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवणारे, _सीडी देशमुख, वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, १९१८ मध्ये झालेल्या *आय्.सी.एस्.* परीक्षेत संपूर्ण देशात पहिले आले होते._

*पहिले भारतीय वंशाचे रिझर्व बँक गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख यांची कामगिरी आजही गौरवली जाते.* _*अवघे जग आर्थिक संकटात असताना भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या त्यांच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक करण्यासाठी “सर” ही पदवी देऊन त्यांचा सन्मान झाला होता.*_

आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या भारतीय जीवन विमा निगम इंडिया, इंटरनॅशनल सेंटर , नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या संस्था, स्थापन आणि उभ्या करण्यात सी.डी. देशमुख यांनी घेतलेला पुढाकार फार महत्त्वाचा होता. 

*आपल्या संपूर्ण आयुष्यात,पत्नी दुर्गाबाई देशमुख यांच्यासह सीडींनी केवळ देशहितासाठी काम केले.* अर्थात *हे सामाजिक कार्य करतानाही त्यांनी आपले संस्कृत प्रेम मनापासून जपले. _देशाचा अर्थसंकल्प सादर करताना सुयोग्य संस्कृत सुभाषितांची पखरण करण्याची “सुसंस्कृत” संसदीय परंपरा_ सीडींनी सुरू केली होती.*

 नोकरी निमित्त चिंतामणराव जिथे जिथे गेले, तिथे उत्तम झाडे लावून, जोपासून त्यांनी चांगली बाग निर्माण केली. 

देशाचा गाडा उत्तम पद्धतीने चालावा, यासाठी चांगली माणसे तयार केली.

अशा *या लोकविलक्षण महाराष्ट्र पुत्राचे, २ ऑक्टोबर १९८३ रोजी हैदराबादेत निधन झाले. _त्यावेळी विस्मृतीत गेलेल्या या पराक्रमी प्रज्ञावंताला साधी शासकीय मानवंदना सुद्धा देण्यात आली नव्हती. “जे दिल्लीत तेच गल्लीत”._* चिंतामण रावांचे मूळ गाव असलेल्या महाड तालुक्यातील “नाते” या गावात त्यांचे जन्मस्थळ आहे. तिथे या विद्वान भूमिपुत्राची आठवण जपणारे यथोचित स्मारक व्हावे असेही आजवर कोणाला वाटले नाही. या सगळ्या अनास्थेच्या पार्श्वभूमीवर, *”नव्या शिवसेनेच्या नव्या कारभाऱ्यांना”*, कोणत्याही राजकीय कारणाशिवाय, सी.डीं.ची आठवण झाली. चर्चगेट सारख्या महत्त्वाच्या स्थानकाला चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. हेच माझ्यासारख्या सीडी प्रेमींसाठी आनंददायी. आता या निर्णयाची लवकर अंमलबजावणी व्हावी. सोबत चिंतामणरावांचे पुस्तक प्रेम लक्षात घेता, चर्चगेट स्थानकातच एक सुसज्ज ग्रंथालय निर्माण करावे.

एवढीच सदिच्छा !

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !