देशाचे रक्षण केले; पण पत्नीला वाचवता आले नाही.
इम्फाळ, दि. २१ मणिपूरमधील हिंसक आंदोलकाच्या गटाने नग्न करून धिंड काढलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेचा पती कारगिल युद्धातील माजी वीर जवान आहे. त्याने कारगीलमध्ये देश वाचवण्यासाठी झुंज दिली पण त्याला मणिपुरात आपल्या पत्नीचा अवमान रोखण्यात मात्र अपयश आले. ४ मे रोजी मणिपुरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपुर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील नवनवीन माहिती रोज बाहेर येते आहे.
भर रस्त्यात नग्न करून सामुहिक बलात्काराची शिकार बनलेल्या दोनपैकी एका महिलेच्या पतीने भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटचे सुभेदार म्हणून काम केले होते. त्यांनी या घृणास्पद प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,
कारगिल युद्धातील | जवानाने व्यक्त केली खत.
मी कारगील युद्धात देशासाठी लढलो आणि भारतीय शांतता दलाचा भाग म्हणून श्रीलंकेतही होतो. मी देशाचे रक्षण केले पण माझ्या निवृत्तीनंतर मी माझ्या घराचे, माझ्या पत्नीचे आणि गावातील गावकऱ्यांचे रक्षण करू शकलो नाही याबद्दल मी निराश, दुःखी आणि उदास आहे, असे त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले.
ते म्हणाले की, ४ मे रोजी सकाळी जमावाने परिसरातील अनेक घरे जाळली, दोन महिलांचे कपड़े फाडले आणि त्यांना लोकांसमोर गावाच्या रस्त्यावरून नग्न चालायला लावले. घटनास्थळी पोलीस हजर होते पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ज्यांनी घरे जाळली आणि महिलांचा अपमान केला अशा सर्व लोकांना कठोर शिक्षा मिळावी, अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुरुवारी याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Leave a Reply