वैयक्तिक लाभाच्या योजनेत होणारी लुट थांबवा : बिरसा फायटर्सची मागणी.
ग्रामीण बातम्या : प्रतिनिधी, शिरपूर |राज्य आणि केंद्र सरकार पंचायत समितीच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की सिंचन विहीर, गुरांचा गोठा, घरकुल योजना, शौचालय, दुधाळ गाई – म्हशी, शेतीविषयक आदी योजना राबवत असते.
त्या योजनांचा लाभ थेट नागरिकांना विना अडथडा मिळणे अपेक्षित आहे. मात्र शिरपूर पंचायत समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या उपरोल्लेखीत वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे मागणे, चेक काढून देणे इ. प्रकारच्या कामांसाठी गलेलठ्ठ पगार असलेले अधिकारी लाभार्थ्यांकडून चक्क 2 हजारांपासून ते 15 हजार रूपयां पर्यंतची मागणी करत असल्याच्या तक्रारीवरून बिरसा फायटर्स संघटनेने बीडीओंना निवेदन देवून लूट थांबवण्याची मागणी केली आहे.
पंचायत समिती मार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनेतून वैयक्तिक लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून होत असलेली लुट थांबविण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.
जर मागणी पुर्ण नाही झाली तर येत्या 15 दिवसांत पंचायत समिती कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, जिल्हा सचिव साहेबराव पावरा, जिल्हा संघटक काकड्या पावरा, तालुका सचिव गेंद्या पावरा आदी उपस्थित होते.
“लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचायत समिती शिरपूर च्या आवारातून अनेक बडे अधिकारी यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तरीही काही अधिकारी गरीब आदिवासिंची लूट करत असल्याच्या तक्रारी आहेत. ही लूटमार थांबली नाही तर बीडीओंच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार.