सांगवी येथील दंगलीची सीबीआय द्वारे चौकशी आणि आदिवासी युवकांवरील गुन्हे मागे घ्या. बिरसा फायटर्स. तसेच एसडीपीओ व एपीआय यांची तात्काळ बदली करा.
सांगवी ता. शिरपूर येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर चारण समाजातील लोकांनी फाडल्यानंतर झालेल्या उद्रेक प्रकरणात सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची तात्काळ बदली करून सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काय म्हटले निवेदनात.
निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर दि. १० ऑगस्ट रोजी चारण समाजातील लोकांनी फाडले. सदर बाब आदिवासी समाजातील बांधवांना समजल्यानंतर आदिवासी बांधवांनी त्या लोकांना जाब विचारायला गेले कि तुम्ही आदिवासी क्रांतीवीरांचे लावलेले बॅनर का फाडले? तर त्याचा राग येऊन चारण समाजातील पुरुष व स्रिया मिळून आदिवासी लोकांना जातिवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.
जखमी झालेल्या आदिवासी लोकांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले. चारण समाजातील मुख्य संशयित आरोपी कान्हा आमला चारण यांचे नाव एफआयआर मधून का वगळण्यात आले?
बॅनर फाडणाऱ्या व आदिवासी बांधवांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पुरूष व महिलांवर ॲट्रोसिटी व इतर गुन्हे दुसऱ्या दिवशी का दाखल करण्यात आले? सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी त्याच दिवशी गुन्हे का दाखल नाही केले? कोणाच्या सुचनेनुसार ते त्यांना वाचवत होते? त्यांनी समय सुचकता का नाही दाखवली?
हेही वाचा Related Information : अनुसूचित जाती जमाती ॲट्रोसिटी कायदा ची माहिती. Link.
आदिवासी क्रांतीवीरांचे बॅनर विटंबना प्रकरणी घडलेल्या दिवशी आदिवासी जन समुदायाची मागणी असताना देखील सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी संशयित समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही. जर योग्य वेळी मागणीनुसार संशयित चारण समाजातील लोकांवर कायदेशीर कारवाई केली असती तर पुढचा अनर्थ टळला असता. आणि कित्येक निर्दोष आदिवासी तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदले गेले नसते.
9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त सांगवी या गावात मोठा कार्यक्रम घेण्यात आला आणि तो पण मोठ्या उत्साहात शांततेने यशस्वीरित्या पार पडला. असे असताना सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी सांगवी येथील आयोजकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे.
असे कोणाच्या सांगण्यावरून झाले? तदनंतर दंगलीत कित्येक निर्दोष आदिवासी लोकांवर गुन्हे दाखल केलेत. अशा गंभीर स्वरूपाच्या चुका करणाऱ्या आणि कारवाईबाबत समय सूचकता न दाखवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या तसेच उद्रेकास कारणीभूत असलेले सपोनि जयेश खलाणे व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि सांगवी घटनेची सीबीआय मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात अशी मागणी करण्यात आली.
निवेदन कर्ते.
यावेळी निवेदन देताना दिपक अहिरे संस्थापक अध्यक्ष भील समाज विकास मंच, अशोक सोनवणे जिल्हा सचिव, विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग बिरसा फायटर्स, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स, ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष बिरसा फायटर्स उपस्थित होते.