३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सोहळा ग्रामपंचायत कार्यालय, कोडीद.!
तेथील काही क्षणचित्रे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने :-
1)-उद्योजिका अहिल्यादेवी:
अहिल्यादेवी उद्योजिका होत्या, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. जशी महाराष्ट्रात पैठणची पैठणी प्रसिद्ध आहे, उत्तर प्रदेशात बनारसचा बनारसी शालू प्रसिद्ध आहे, तशी मध्य प्रदेशात महेश्वरची माहेश्वरी साडी प्रसिद्ध आहे.हे सर्वश्रूत आहे की, महेश्वरचा विकास अहिल्यादेवींनी केला आहे.
जेव्हा महेश्वरचा विकास केला जात होता तेव्हा महेश्वरमध्ये उद्योग व्यवसाय आणण्याचं महत्कार्य कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवींनी. एकमेकांना लुटण्याच्या नादात तत्कालीन राजे-रजवाड्यांनी राज्यात उद्योग व्यवसाय उभारून गोरगरीब जनतेसाठी रोजगार निर्मितीचं एकही उदाहरण बघायला मिळत नाही.
महेश्वरमध्ये लोकसहभागातून कापड उद्योग उभारून आजच्या सहकार क्षेत्राचा पाया त्या काळी अहिल्यादेवींनी खर्या अर्थाने रूजवला*. किती मोठा आणि विशाल दृष्टिकोण आहे हा..! त्यांनी महेश्वरमध्ये साडी विणकाम व्यवसाय आणला आणि विशेषतः पहिली माहेश्वरी साडी आणली. नंतरच्या काळात हा विणकाम व्यवसाय इतका प्रचंड बहरला की, माहेश्वरी साडी/शालू भारतभर प्रसिद्ध झाली. दुर्दैवाने, जातांधळ्या इतिहासाने उद्योजिका अहिल्यादेवी होळकर यांची दखल घेतलीच नाही..!
2)- महिलांची फौज उभारणारी जगातील एकमेव सम्राज्ञी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर :*
जगात राज्य करणाऱ्या सम्राज्ञ्या वा प्रस्थापितांविरूध्द बंड करणाऱ्या महिला झाल्या नाहीत असं नाही! जोन ऑफ आर्क (सम्राज्ञी नसली तरी कार्य एखाद्या सम्राज्ञी सारखंच होतं ना, म्हणून सम्राज्ञी), रझिया सुलतान, राणी एलिझाबेथ, राणी लक्ष्मीबाई, इ. सम्राज्ञींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांपेक्षा वेगळ्या यासाठी होत्या की त्यांनी महिलांची फौज उभारली होती. *महिलांची फौज उभारण्याचं जगाच्या इतिहासातील हे एकमेव अद्वितीय असं उदाहरण आहे.* म्हणून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी इतरांपेक्षा श्रेष्ठ होत्या..!
3) – सतीप्रथा बंद करणार्या अहिल्यादेवी:
अहिल्यादेवींच्या काळात सतीप्रथा प्रचलित होती. हिन्दू धर्मावर ही प्रथा म्हणजे कलंक होता. जिवंत स्त्रीला सार्वजनिकरित्या जिवंत जाळण्याचा क्रूर आणि रानटी अमानुष प्रकार जगात कुठल्याही धर्मात नसेल. जेव्हा अहिल्यादेवींचे पती खंडेरावांना कुंभेरीच्या युद्धात सुरजमल जाटाविरोधात युद्ध करतांना विरमरण आलं तेव्हा त्या प्रथा परंपरेनुसार सती जायला निघाल्या, परंतु सासर्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सतीप्रथा झुगारून दिली आणि सासर्याच्या मार्गदर्शनाखाली आदर्श राज्यकारभार केला. मल्हाररावांनी सती जायला विरोध केल्यावर अहिल्यादेवींनी त्याचा स्वीकार केला आणि त्या आदर्श तत्वज्ञानी सम्राज्ञी म्हणून उदयाला आल्या. थोडक्यात, सती प्रथा बंद करण्यात मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं योगदान मोठं आहे. जे काही परिवर्तनवादी व सुधारणावादी विचारवंतांनी विचारांतून मांडले ते त्यांनी कृतीतून सिद्ध केले.
4) – न्यायप्रिय अहिल्यादेवी होळकर*:
अहिल्यादेवी न्यायप्रिय होत्या. त्या कुठलाही बडेजाव नसलेल्या राज्यकर्त्या होत्या. त्यांच्या दरबारात गोरगरीब-सर्वसामान्यांना सहजच प्रवेश होता. त्यांच्या न्यायदानाची पध्दत इतकी पारदर्शक आणि अभिनव होती की, त्यांच्या न्यायदानावर कोणीही शंका उपस्थित करत नसे. त्यांनी एका प्रसंगी स्वत:चा मुलगा मालेराव यांनाही शिक्षा दिल्याचा दाखला इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या दरबारात गोरगरीबांना न्याय मिळण्याची शाश्वती होती. म्हणूनच गोरगरीब त्यांना *मातोश्री* म्हणून संबोधित असत आणि हक्काने न्यायासाठी अहिल्यादेवींकडे धाव घेत. त्यांच्या न्यायदानाची पध्दत इतकी प्रभावी आणि लोकप्रिय होती की, शेजारील रजपूत राजेसुध्दा त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येत असत.
5) – स्त्रीसुधारणावादी अहिल्यादेवी होळकर* :
न्यायदान प्रक्रियेत अहिल्यादेवींचं एक लक्षात आलं की, समाज व्यवस्थेत सर्वात जास्त अन्याय स्त्रीवर्गावर होत असतो*, म्हणून त्यांनी स्वत:च्या राज्यात स्त्रीयांना अनुकूल कायदे केलेत, उदा. दत्तक घेण्याचा अधिकार, संपत्ती बाळगण्याचा अधिकार, इ.
6) – संपूर्ण भारत जोडणारी सम्राज्ञी अहिल्यादेवी*:
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी भारतातील चार धाम जोडणारा रस्ता तयार करून भारत जोडला. अनेक राज्यकर्त्यांनी किल्ले आणि महाल बांधण्यात धनद्रव्य खर्च केलं, पण जगाच्या पाठीवर अहिल्यादेवी नावाची एक विशाल दिव्यदृष्टी प्राप्त असलेली सम्राज्ञी होती जिने जनतेकडून करस्वरूपात आलेला पैसा रस्ते, तलाव, धर्मशाळा, मंदीर-मस्जिद व चर्च बांधण्यात खर्ची केला. *आपल्या राज्याच्या बाहेरसुध्दा विकासकामे करण्याचं एकमेव अद्वितीय असं जगावेगळं उदाहरण अहिल्यादेवींचं आहे.* त्यांनी जनतेच्या विकासासाठी वापरलेले धनद्रव्य जर स्वत:च्या ऐशोआरामासाठी म्हणजे किल्ले व राजमहाल बांधकामासाठी वापरले असते तर कदाचित जगातील सर्वात जास्त किल्ले, राजवाडे व राजमहाल त्यांच्याच नावावर राहिले असते. किंबहुना, *पेशवे व ब्रिटीशांना कर्ज देणारे होळकर संस्थान हे भारतातील, कदाचित त्याकाळी जगातील, सर्वात श्रीमंत संस्थान होतं.* परंतु, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जनहित लक्षात घेऊन भारतभर व भारताबाहेरही कार्ये केले. अगदी महेश्वर येथे जो किल्ला बांधला त्यातसुद्धा स्वत:साठी राजमहल न बांधता लाकडी खांब असलेल्या घरासारखी *कुटी* बांधली व तिथे त्या राहिल्या. *त्या पाहिजे तेवढं मोठं सिंहासन तयार करू शकल्या असत्या परंतु त्यांची बैठक व्यवस्था ही जनतेसोबत जमिनीवर असायची जेणेकरून गोरगरीब जनतेच्या स्तरावर जावून त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे .* म्हणूनच गोरगरीब रयतेला त्या *मातोश्री* वाटायच्या.
7) – रयतेच्या सुखासाठी स्वत:च्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून देणारी सम्राज्ञी*:
रयत हिच अहिल्यादेवींची खरी संतान-संपत्ती होती.* यासाठी त्यांनी स्वत:च्या संतानालाही डावावर लावलं. जेव्हा त्यांच्या राज्यातील भिल्लांनी जाणार्या-येणार्या वाटसरू व व्यापार्यांना लुटमारीचा सपाटा लावला होता तेव्हा त्यांनी जाहीर केलं की ‘जो कोणी पराक्रमी पुरूष या लुटमार करणार्या भिल्लांचा बंदोबस्त करेल, त्या व्यक्तीसोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन.’ अशात, यशवंतराव फणसे या तरूणाने लुटारू भिल्लांचा बंदोबस्त केला आणि अहिल्यादेवींनी शब्दाला जागत त्यांची एकुलती मुलगी मुक्ताबाईचा विवाह यशवंतराव फणसे सोबत त्याची जात न बघता लावून दिला. जनतेच्या संरक्षणासाठी एखादा राजा किंवा राणीने उचललेलं हे पाऊल कदाचित जगात कुठेही पहायला मिळणार नाही. *ज्या काळात स्वत:च्या राजकुमारीचा विवाह आपल्यापेक्षा बलाढ्य राजघराण्यातील राजपुत्राशी लावण्यात राजे-रजवाड्यांमध्ये चढाओढ होती, त्या काळी एक श्रीमंत व बलाढ्य संस्थांनाची सम्राज्ञी आपल्या एकुलत्या एक राजकन्येचा विवाह जनतेच्या भल्यासाठी कुठल्याही तरूणाशी लावून देण्यास तयार होते, जनतेसाठी असलेला यापेक्षा मोठा त्याग दुसरा कोणता असू शकतो?*
8) – गोरगरीबांची अन्नदाती अहिल्यादेवी*:
अहिल्यादेवींनी नुसते मंदिरे उभारली नाहीत तर त्यांनी धर्मशाळा व अन्नछत्रे उभारली. गोरगरीब भिल्ल समाजाने राज्यात लुटालूट चालविली होती. त्यांना बोलावून त्यांना अहिल्यादेवींनी जाब विचारला. त्यावेळी भारतभर जातियव्यवस्थेने अक्षरशः हैदोस माजवला होता. सर्वच मागासवर्गीय जमाती व भिल्लांना संपत्तीसंचयनाचा अधिकार नव्हता. परिणामी, आदिवासी भिल्ल कष्टाळू असूनही जमिनदार नव्हते. मग दुष्काळी परिस्थितीत त्यांना लुटालूट शिवाय पर्याय नव्हता. त्यांची ही व्यथा जाणून घेऊन, अहिल्यादेवींनी त्यांना रोजगार दिला. त्यांच्यावर जाणार्या-येणार्या प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली आणि त्यांना पगार दिला. त्या पगाराचा खर्च ‘भिल्ल कवडी कर’ आकारून केला. थोडक्यात, *चोरालाच संरक्षणाची जबाबदारी दिली.* बुद्धीचातुर्याचा एवढा मोठा नमुना जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळणार नाही. *गोरगरीबांना वाममार्गावरून सन्मार्गाला लावणार्या अहिल्यादेवी खूप महान होत्या.*
9) – राष्ट्रप्रेमी अहिल्यादेवी* :
भारतात अनेक राष्ट्रप्रेमी व राष्ट्रवादी होऊन गेले. अहिल्यादेवींनी अनेक भारतीय संस्थानिकांना पत्र लिहून ब्रिटिशांविरुद्ध सावध केलं होतं. हा ब्रिटिश नावाचा पांढरा अस्वल भारताचे लचके तोडण्यासाठी सज्ज आहे आणि म्हणूनच आपण त्याला वेळीच रोखलं पाहिजे, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी इतर भारतीय राज्यकर्त्यांना दिला. त्यांनी ब्रिटीशांना आपल्या राज्यात चंचुप्रवेश करूच दिला नाही. ब्रिटीशांविरूध्द त्यांचा हा पवित्रा राष्ट्रप्रेमाचा मुर्तीमंत नमुना आहे.
10) – धार्मिक सहिष्णूता बाळगणार्या अहिल्यादेवी* :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी धार्मिक जरूर होत्या, परंतु धर्मांध मात्र बिल्कुल नव्हत्या. म्हणून त्यांनी मंदिरं बांधली, परंतु त्यासोबतच त्यांनी मस्जिदे व चर्चही बांधल्या व सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. *त्यांचा नैतिक दबदबा इतका जबरदस्त होता की, हिंदूंची मंदिरं उध्वस्त करणार्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राज्यातही त्यांनी त्यांच्याच परवानगीने मंदिरं बांधली.* उदा. काशी येथील काशी विश्वनाथाचे मंदिर.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी धार्मिकता जोपासली, परंतु हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा झुगारून दिल्या. अहिल्यादेवींच्या हातात नेहमीच महादेवाची पिंड असते. त्याचं कारण म्हणजे त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती व राज्यकारभार करतांना आपल्या हातून एकही निर्णय स्वार्थी हेतूने, अन्यायकारक व प्रजेला नुकसानकारक घेतला जावू नये, म्हणून परमेश्वराला साक्षी ठेवूनच त्या राज्यकारभार बघत असत. थोडक्यात, त्या प्रजाहितदक्ष सम्राज्ञी होत्या.
11) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* :
पती खंडेरावांच्या मृत्यू नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी या संन्यस्थ जीवन जगल्या. एका बलाढ्य राजघराण्यातील राणी असुनही ऐहिक सुखाचा सर्वसंगपरित्याग त्यांनी केला. *अंगावर पांढरी साडी, गळ्यात पांढर्या मणींची माळ, कपाळावर पांढरा शुभ्र टिळा व पायात खळा हा त्यांचा पेहराव होता*. त्या स्वत:साठी नव्हे तर जनतेसाठी जगत होत्या. आपल्या रयतेवर त्यांची पोटाच्या मुलासारखी माया होती. त्यांचं राज्य हे खर्या अर्थाने रयतेचं राज्य होतं. कर रूपाने जमा होणारा सरकारी तिजोरीतला पैसा सुध्दा ते स्वत:साठी कधीच वापरत नसत. मानवजातीसोबतच मुक्या प्राणिमात्रांच्यासुध्दा अन्नपाण्याची त्यांनी व्यवस्था केल्याचे अनेक दाखले इतिहासात बघायला मिळतात. मानवजातीसोबतच मुक्या प्राणिमात्रांवर भूतदया दाखविणार्या अहिल्यादेवी अहिंसावादीसुध्दा होत्या. म्हणून त्या ‘पुण्यश्लोक’ ठरल्या. जनतेसाठी भारतभर रस्ते, धर्मशाळा, विहिरी, बारवा व तलाव बांधणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा हा सुधारणावादी आणि परिवर्तनवादी इतिहास समाजासमोर आणणं गरजेचंच आहे.
धाडसी आणि मुत्सद्देगिरी.
सासरे मल्हारराव आणि पुत्र मालेराव यांच्या निधनानंतर ही बाई एकाकी पडली आहे, असं समजून श्रीमंत रघुनाथराव पेशव्यांनी जेव्हा, होळकरांचं संस्थान बळकावण्याच्या हालचाली सुरु केल्या तेव्हा… *
“मी बायमाणूस काय करणार म्हणून मनास आणू नका. खांद्यावर बासडा(भाला) टाकून उभी राहिली, तर श्रीमंतांच्या दौलतीस भारी पडेल. ही दौलत आमच्या वाड-वडिलांनी भाड-भाटगिरी करुन मिळविली नाही, तर तलवारीच्या अनुमाने शरीर खर्ची घातले आहे.
असं जेव्हा अहिल्यादेवीनी खडसावलं, तेव्हा ‘ज्यांचे घोडे अटकेचं पाणी प्यायलेत’ असा लौकिक असणाऱ्या, राघोबा पेशव्यांच्या तोंडंचं पाणी पळालं.
इतिहासाच्या पानांवर जिचं चित्रण एक साध्वी, देवभोळीबाई असं केलं आहे, अशा बाईमाणसात हा करारीपणा, ही जरब आणि हे कमालीचं धाडस आलं कुठून? त्याचं मूळ वैदिकांनी नेणिवेत दफन केलेल्या समतावादी स्री सत्तेत आहे.
अहिल्यादेवीनी लोकोपयोगी निर्माणकार्या बरोबरच सम्राट अशोक व शिवरायांचा वैचारिक वारसाही पुढे चालविला. इतिहासकारांनी त्याकडे भले कानाडोळा करु देत, पण आपण मात्र अहिल्यादेवीच्या कर्तबगारीच्या दुसऱ्या बाजूकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
त्यांच्या ऐतिहासिक कार्यातून प्रेरणा घेवून आपण ही बहुजन समाजाला न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, हक्क आधिकार मिळवून देण्यासाठी परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होऊया.
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!* 🌹🙏