Police Crime News | पोलीस कमी पडतात की गुन्हेगार भारी ठरतात, जनतेला कळेनाच.

साताऱ्यात इतक्या साऱ्या बंदुका येतातच कुठून? पोलीस कमी पडतात की गुन्हेगार भारी ठरतात, जनतेला कळेनाच. | Police Crime News.

सातारा / विनोद कुलकर्णी.

सातारा जिल्हा हा तसा सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो. साताऱ्यातील वातावरण अतिशय शांतताप्रिय आहे. अधून-मधून सातारा जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारी बोकाळते, ही जरी वस्तुस्थिती असली तरी तिचा बंदोबस्त वेळोवेळी तत्कालिन पोलीस अधीक्षकांनी केलेला आहे. 


त्यामुळे त्याची फार मोठी झळ सामान्य जनतेला बसलेली नाही. मात्र, सध्या जे काही चाललेले आहे, ते कळण्याच्या पलिकडले आहे. साताऱ्यासारख्या सर्वच बाबतीत मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात इतक्या साऱ्या बंदूका येतातच कुठून, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

कोणीही उठतो आणि कोणावरही धाडधाड गोळ्या झाडतो, हे आता सर्रासपणे पहायला मिळायला लागले आहे. गेल्या काही वर्षात आणि आता दर महिन्याला अशा घटना घडायला लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गल्लीबोळात विनापरवाना बंदूका बाळगल्या जात असल्याची चर्चा सुरु आहे. हे सगळे बदलण्याचे आव्हान सध्याच्या पोलीस व्यवस्थेसमोर आहे. 

बंदूकातून गोळी बाहेर पडते, त्याचवेळी गुन्हेगारांना शोधण्याचे काम पोलीस करतात. आपल्या साताऱ्यातही आता सहजपणे बंदूका उपलब्ध होवू लागल्या आहेत, हे वास्तवही नाकारुन चालणार नाही. गोळीबार होण्यापूर्वीच गुन्हेगारांचा बंदोबस्त का केला जात नाही, हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. गुन्हा घडण्यापूर्वीच विनापरवाना आणि बेकायदेशीरीत्या बंदूक बाळगणाऱ्यांची माहिती पोलिसांना का मिळत नाही? पोलीस तपास करण्यात, खबऱ्यांचे जाळे विणण्यात कमी पडत आहेत. 

की गुन्हेगार त्यांना भारी ठरत आहेत हेच न उलगडलेले कोडे आहे. पूर्वी फक्त कराडमध्येच अधून-मधून गोळीबाराच्या घटना घडायच्या आणि तशा बातम्या ऐकायला मिळायच्या. मुंबईच्या तोडीचे गुन्हेगार कराडमध्ये होते आणि आहेत. कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर टोळीयुध्दही चालयाचे. कित्येक गँग आणि गुन्हेगार कराडमध्ये उदयास आले आणि संपलेही. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कराडमध्ये चालायाची.

साताऱ्यात मात्र तसे घडत नव्हते. आता साताऱ्यातही गेल्या काही वर्षामध्ये गोळीबार होण्याचे प्रमाण वाढले आहे. सहजपणे कोणीही, कुठेही गोळीबार करतो आहे. 

पोलिसांची, कायद्याची भीती गुन्हेगारांना राहिली नाही, असा संदेश अशा घटनांमधून मिळत आहे. हे सगळे जे काही घडते आहे ते एका दिवसात घडत नाही. गेली कित्येक वर्षे ही गुन्हेगार निर्माण होण्याची प्रक्रिया सुरुच आहे. सातारा शहरात अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरही यापूर्वी गोळीबार झालेला आहे. गेल्या दोन महिन्यात राजवाडा आणि मंगळवार पेठ परिसरात गोळीबाराच्या घटना लागोपाठ घडल्या आहेत. 

मंगळवारी भादे, ता. खंडाळा गावच्या हद्दीत गोळीबार झाला आहे. अशा गोळीबारांसाठी मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन युवकांचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी अल्पवयीन युवकांचीच टोळी तयार होत आहे. या सगळ्यांना सहजपणे बंदूका कशा मिळतात, हा गंभीर प्रश्न आहे. इतक्या सहजपणे बंदूका उपलब्ध होत असतील तर भविष्यात काय काय घडू शकेल याचा विचार करण्याची गरज आहे.

लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासनाचे प्रमुख असतील त्यांनी अशा घटनांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. इतक्या साऱ्या बंदूका येतातच कोठून याचा शोध घेण्याची गरज आहे. सहजपणे बंदूका उपलब्ध होतात आणि त्या बाळगल्या जातात, याचा अर्थ कायद्याचा धाक कमी झाला आहे. 

गोळीबार केल्याशिवाय कोणालाही काहीही होवू शकत नाही, अशी मानसिकता गुन्हेगारांची आहे. सहजपणे हत्यारे उपलब्ध होणे म्हणजे कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्याची लक्षणे आहेत. ही सगळी परिस्थिती बदलण्याची धमक सातारच्या पोलीस दलात आहेत. यापूर्वीही साताऱ्यात बोकाळलेल्या गुन्हेगारांचा बिमोड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आताही तसा बंदोबस्त करणे कठीण जाणार नाही. 

मात्र, घटना घडण्यापूर्वीच बेकायदेशीररीत्या शस्त्र बागळणारे बिळाबिळातून शोधून आणि ठेचून काढले पाहिजेत. त्यासाठी पोलीस दलाने एखादे मोठे ऑपरेशन राबवण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर गुन्हेगार शोधणे खूप अवघड काम नाही. मात्र, घटना घडण्यापूर्वी गुन्हेगारांना मुळापासून उखडून टाकणे अवघड आहे. ही अवघड कामगिरीच पोलिसांनी हातात घेतली पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी वाट्टेल ते करायला लागले तरी पोलिसांनी केले पाहिजे. गुन्हा घडण्याची वाट यापुढे तरी पोलिसांनी बघू नये, अशी अपेक्षा आहे.

गुन्हेगारांना वाचवण्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधीही पुढाकार घेत असतात. ही गोष्ट कधीही कागदावर येत नाही. मात्र, किमान जे बंदूका वापरतात, सार्वजनिक ठिकाणी कुठेही अंधाधुंद गोळीबार करतात अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी टाळली पाहिजे. लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी असले की काहीही होत नाही. काही केले तरी आपण दोन ते तीन महिन्यात बाहेर येतो.

आपल्याला सहज जामीन मिळतो, अशी भावना गुन्हेगारांमध्ये आहे. काही गुन्हेगारांना तशा प्रकारे जामीन मिळतोही. ठोसपणे कायद्याच्या सर्व कलमांचा वापर करुनही गुन्हेगार कायद्यातील पळवाटा शोधून जामीन मिळवण्यात यशस्वी होतात. या सर्व बाबींचा विचार पोलिसांबरोबर लोकप्रतिनिधींनीही केला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकीच किंवा त्याहूनही अधिक ती लोकप्रतिनिधींची आहे. एकुणच लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने हातात हात घालून अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी काम केले पाहिजे.

मुळशी पॅटर्नवाल्यांचाच बोलबाला.

मुळशी पॅटर्न राबवण्याच्या कल्पनाही सध्या सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मनात मोठ्या प्रमाणावर आहेत. म्होरक्याला संपवले की आपले मोठ्या प्रमाणावर नाव आणि दहशत होईल. किरकोळ किंवा टोळीतील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील साथीदाराला संपवले तर तेवढे क्रेडीट मिळत नाही.

त्यामुळे मुख्य जो कोणी असेल त्यालाच संपवायचे आणि एका दिवसात नावारुपाला यायचे, असे स्वप्न उदयोन्मुख गुन्हेगार पाहत आहेत. मुळशी पॅटर्न आपल्याकडे रुजायला नको असेल तर मुळापासून आणि वेळीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

डॅशिंग समीर शेख यांनी बंदुकधाऱ्यांचा बंदोबस्त करावा.

पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे डॅशिंग अधिकारी समीर शेख यांनी घेतली आहेत. नक्षलग्रस्त भागात काम करुन आल्याने कोणत्याही गुन्हेगारीचा बिमोड कसा करायचा याची त्यांना चांगलीच माहिती आहे.

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीभोवती झालेले अतिक्रमण काढण्याची मोहिम अतिशय चांगल्या प्रकारे हाताळून त्यांनी आपल्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवली आहे. कायदा व सुव्यवस्था उत्तमरीत्या सांभाळण्याचे भान त्यांना आहे.

पोलीस दलाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी ते आल्यापासून काम करत आहेत. मात्र, भविष्यात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका आणि सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना बंदूकधारी गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. सर्वव्यापी कार्यक्रम तयार करुनच त्यांना तो राबवावा लागणार आहे. 

पोलीस दलामध्ये आलेली शिथिलता दूर करुन गुन्हेगारांना बिळातून बाहेर काढून ठेचावे लागणार आहे. समीर शेख हे निश्चितपणे बंदुका बाळगणाऱ्यांचा बंदोबस्त करतील, अशी खात्री वाटते. या कामासाठी त्यांनी प्राधान्य द्यावे, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !