शिक्षण म्हणजे नक्की काय? What exactly is education?
ठाण्यात राहत असतांना माझ्या मोठ्या मुलाचा तन्मयचा जन्म झाला. त्यानंतर दोनेक वर्षांने त्याच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. आम्हा दोघांनाही मराठी माध्यमातून चांगले शिक्षण देणारी शाळा हवी होती कारण आम्ही मुलांना मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण द्यायला हवे या मताचे होतो.
परंतु आमच्या आजुबाजूला तेंव्हा सगळे इंग्रजी माध्यम, सिबीएसई, आयसीएससी, आयबी वगैरे भारी भारी महागड्या स्कुल्सवाले पेरेंट्स असतांना मराठी स्टेट बोर्ड म्हणजे गरिबांवर उपकार म्हणून दिले जाणारे तकलादू शिक्षण असा समज असणारे लोक होते.
ज्यांच्या फ्लॅटमध्ये आम्ही रेंटवर होतो ती व्यक्ती एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत बर्यापैकी मोठ्या हुद्द्यावर होती. त्यांनी दिल्लीला दुसरी नोकरी अशाच मोठ्या कंपनीच्या सीईओ पदाची घेतली. मुलाला तिथल्या मोठ्या महागड्या इंटरनॅशनल स्कुल मध्ये घातलं… माझ्या मुलाचा तन्मयचा त्यांना खूप लळा होता. तेंव्हा त्यांनी तन्मयला कुठल्या शाळेत घालणार असे विचारले, आम्ही मराठी म्हटल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या, ज्या कुत्सितपणातून नव्हत्या तर काळजीमुळे होत्या.
आमची बरीच चर्चा झाली, मी माझे मुद्दे मांडल्यावर ते मला एकच वाक्य बोलले आणि ते गेले दहा वर्षे नेहमीच माझ्या कानात वाजत राहतं…
What exactly is education? | शिक्षण म्हणजे नक्की काय? |
ते म्हणाले. “असो, ज्याचे त्याचे अॅस्पिरेशन्स…”
आई शप्पथ, अॅस्पिरेशन्स हा शब्द मी त्यावेळी पहिल्यांदा ऐकला. नंतर डिक्शनरीत शोधला… अॅस्पिरेशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा.. अॅस्पिरेशन्स म्हणजे आपल्याला आयुष्यात काय अचिव्ह करायचे आहे त्याचे स्पष्ट चित्र, अॅस्पिरेशन्स म्हणजे आपल्या आयुष्याचे ध्येय, आपल्याला काय व्हायचे आहे, कुठे जायचे आहे, आपल्याला काय कमवायचे आहे, काय सिद्ध करायचे आहे… अशा अनेक प्रश्नांचं एकच उत्तर म्हणजे – युअर अॅस्पिरेशन्स.
त्या शब्दाने मला खूप विचारात पाडले. त्यांचा मुलगा ज्या शाळेत शिक्षण घेत होता ती शाळा थेट सिईओ, सिओओ, डायरेक्टर्स, वगैरे बनवण्यासाठी मुलांना घडवत होती. त्यांचे अॅस्पिरेशन्स क्लिस्टलक्लिअर होते. मुलांना अशा प्रकारे घडवले जाते की आता ते थेट शेकडो-हजारो कोटीच्या वर टर्नओव्हर असणार्या कंपन्याच चालवणार आहेत.
माझ्या अॅस्पिरेशन्स काय आहेत यापेक्षा त्यांच्या अॅस्पिरेशन्स काय आहेत यावर आधी मी विचार केला. त्या तशा का आहेत, दुसरे काही त्यांना का सुचले नाही, किंवा त्यांच्याकडे माझ्यापेक्षा अधिक माहिती, अधिक संधीची उपलब्धता, अधिक सुबत्ता आहे म्हणून ते असे आहेत का. असे अनेक प्रश्न पडले… त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला तर कळले की त्यांचे अॅस्पिरेशन्स तसे असण्याचे कारण त्यांच्या भोवतालचे वातावरण, गोतावळा, संगत कारणीभूत आहे. त्यात ते अजिबात चूक नाहीत.
मग आपलं काही चुकतंय का? त्याचा अभ्यास केला. आमच्या मुलांसाठी काय अॅस्पिरेशन्स आहेत यापेक्षा काय असायला हव्यात याबद्दल खूप अभ्यास आणि संशोधन केले….
शिक्षणाचे सरतेशेवटी मला काही मुद्दे सापडले, ते म्हणजे.
१. स्वतःचे मत मांडण्याचा आत्मविश्वास,
२. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता,
३. बदलत्या परिस्थितींमध्ये शारिरीक मानसिक संतुलन सांभाळून कठिणातल्या कठिण समस्यांवर मार्ग काढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती.
४. प्रयोग करण्यासाठीची मानसिकता,
५ प्रश्न विचारण्याची मानसिकता,
६ स्वतः अभ्यास करुन उत्तरे शोधण्याची इच्छाशक्ती.
७. प्रस्थापित ऑथोरिटीला आव्हान देण्याची क्षमता आणि धमक.
८. स्वतः जबाबदारी घेऊन निर्णय राबवण्याची क्षमता.
९. समाजभान व
१०.आत्मज्ञान
हे मुद्दे काढल्यानंतर जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या क्षमतांची गरज कायमच असते असे मला लक्षात आले. मुलांना पायलट करण्यासाठी किंवा सिइओ करण्यासाठी किंवा आयआयटी करण्यासाठी किंवा युएस मध्ये एमएस करायला पाठवण्यासाठी शिक्षण द्यायचे असते हा मुद्दाच मी निकालात काढला… कारण या सर्व क्षेत्रात जाण्यासाठीचे मूलभूत गुण जर माझ्या मुलांत असतील तर ते कुठेही जाऊन काहीही अचिव्ह करु शकतील इतकी त्यांची क्षमता असेल. मी रेडीमेड पायवाट बांधून देण्यापेक्षा त्यांचे पंख विकसित करण्यास मदत करणार या विचारापर्यंत मी पोहोचलो…
शिक्षणाचे बेसिक महत्त्व ?
शिक्षण म्हणजे पाढे पाठ करा, बाराखडी शिका, गणित करा, भुगोल वाचा, इतिहास वाचा, साक्षर व्हा इतक्यापर्यंत मर्यादित नाही. हे खूप बेसिक आहे. आणि पुढील कारकिर्दीसाठी बेसिकचा पाया पक्का करायचा असतो. त्यामुळे बेसिक महत्त्वाचे आहेच.
शिक्षण म्हणजे काय ? आणि उद्दिष्ट. काय?
‘शिक्षणाचे उद्दिष्ट मानवाचा उर्ध्वगामी स्वयंविकास’ हे असले पाहिजे आणि ते नक्की काय हे मला वरील दहा मुद्द्यांत सापडले. हे मुद्दे काढतांना मी कोणत्याही शिक्षणतज्ञाचे कोणतेही पुस्तक भाषण वाचले-ऐकले नाही. त्यामुळे माझ्या आधीच कोणी हे मुद्दे मांडले असतील तर माहिती नाही.
हे पूर्ण विवेचन नाही. फक्त इन्ट्रोडक्शन आहे.
याचे आणखी भाग लिहायचे आहेत कारण अजून काही मुद्दे आहेत, जमले तर लिहितो.
शिक्षण_म्हणजे_काय | What exactly is education? |
Leave a Reply