धुळे सीईओंचा आदेश, प्रभारी पदभार शिंदखेड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे.
ग्रामीण बातम्या धुळे: रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सिंचन विहीर आणि गायगोठे मंजूर करण्यात येणार आहेत. याकरिता धुळे पंचायत समितीच्या माध्यमातून थेट अर्ज छापण्यात आले. ते तालुक्यात वाटप करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याची दखल घेत, सीईओ बुवनेश्वरी एस. यांनी गटविकास अधिकारी आर.डी. वाघ यांच्याकडील पदभार काढत, प्रभारी जबाबदारी शिंदखेडाच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी वाघ यांचा पदभार काढला. |
तालुक्यात सिंचन विहिरींची सातत्याने चौकशी सुरू असल्यामुळे. २०१२ पासून चौथ्यांदा धुळे तालुक्यात रोहयोच्या कारभारात घोळ.
धुळे तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर आणि गायगोठा प्रकरणांची मंजुरी व अंमलबजावणी नेहमीच चर्चेत राहिली आहे. यापूर्वी तीन गटविकास अधिकान्यांना रोजगार हमी कामांच्या मंजुरी, अमलबजावणी प्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर आता प्रभारी गटविकास अधिकारी आर.डी. वाघ हेही अडचणीत आले आहेत.
२०१७ पासून सिंचन विहिरीच मंजूर करण्यात आल्या नाहीत. ४ नोव्हेंबर, २०२२ रोजी मागेल त्याला विहीर योजना सुरू करत, सिंचन विहिरींसाठीची अनुदानाची रक्कम वाढविण्यात आली आहे. तसेच निवडीचे निकष आणि पद्धतही निश्चित केलेली आहे. मात्र, असे असताना धुळे तालुक्यात गायगोठा आणि सिंचन
विहिरीसाठी अर्ज छापण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना प्रत्येकी २० अर्ज देण्यात आले. या अर्ज वाटपावरून मोठा गदारोळ तालुक्यात सुरू झाला. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील यांनी स्थायी समितीत रोहयोचे अर्ज २० हजार रुपयांनी वाटप करण्यात येत असल्याचा आरोप केला.
यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तपास आणि चौकशीचे सत्र सुरू झाले. या प्रकरणी धुळे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ यांना पदावरून दूर करण्यात आले आहे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी त्यांच्याकडील गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे, तर आता धुळे पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार शिंदखेडा गटविकास अधिकारी डी.एम.देवरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.