माहिती अधिकारातील माहिती मोफत देण्याचे राज्य माहिती आयुक्तांचे आदेश. असतानाही पैश्यांची मागणी केल्याप्रकरणी तलाठी, कोतवाल विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल.
तलाठ्याला अटक केल्याने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकारातील माहिती विनामूल्य देण्याचे राज्य माहिती आयुक्तांचे आदेश असतानाही पैश्यांची मागणी करणाऱ्या तलाठी व कोतवालला चांगलेच महागात पडले आहे. असे असताना मुळशी तालुक्यातील उरवडे येथील तलाठी संजय बाबुराव दाते आणि कोतवाल अमित भंडलकर यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ९४२ रुपये लाच घेण्याचे मान्य केले.
याप्रकरणी पुणे एसीबीने दाते आणि भंडलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर तलाठी दाते यांना अटक केली आहे. याबाबत ६७ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी माहिती अधिकारात कागदपत्रे मागितली होती. माहिती अधिकारात मागवण्यात आलेली कागदपत्रे विनाशुल्क देण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले आहेत.
मात्र तलाठी संजय दाते यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ९४२ रुपये देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० डिसेंबर व २ जानेवारी रोजी पडताळणी केली असता, तलाठी दाते यांनी कागदपत्रे देण्यासाठी ९४२ रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तर कोतवाल अमित भंडलकर याने लाच घेण्याच्या मागणीस प्रोत्साहन दिले. त्यानुसार दोघांवर पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तलाठी संजय दाते यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.
Leave a Reply