दी प्रदूषण मुक्तीसाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना सुरू. जलज शर्मा
‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाबाबत चर्चासत्र संपन्न
नाशिक, दिनांक: 3 ऑक्टोबर, 2023. वृत्त क्र. 378 दिनांक: 3 ऑक्टोबर, 2023
पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून त्यादृष्टीने जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी शासन व जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमांतर्गत आयोजित चर्चासत्रात जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते.
या चर्चासत्रात जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, आध्यात्मिक गुरू श्री.एम, जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य तथा नमामि गोदा फाऊंडेशनचे चेअरमन राजेश पंडित, समिती सेक्रेटरी नरेंद्र चुग, नमामि गोदा फाऊंडेशनचे सदस्य या उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, सत्संग फाउंडेशनच्या एम वसुकी, लक्ष्मण सावाजी यांच्यासह जिल्ह्यातील नद्यांनिहाय नियुक्त समन्वयक, अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले, आयोजित चर्चासत्रात पर्यावरण रक्षण व नदी प्रदुषणाबाबत चर्चा होवून अनेक सूचना आलेल्या आहेत. यासाठी पर्यावरण तज्ञांशी संवाद साधून आवश्यक उपययोजना शासनास्तवर करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील वालदेवी, कपिला, नंदिनी, म्हाळूंगी व मोती या नद्यांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या धर्तीवर टास्क फोर्स ची निर्मिती करून प्रत्येक नदीसाठी एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून नदीसंबंधीचा अहवाल वेळोवेळी प्राप्त करून घेतला जाईल. येणाऱ्या नदी प्रदुषणमुक्ती साठी मोठ्या स्वरूपाचे कार्यक्रमांची आखणी केली जाईल ज्यातून चांगले बदल नक्कीच समोर येतील. समिती सदस्यांच्या सूचक चांगल्या योजनांचे स्वागत असून संवाद हा महत्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
*नाशिकची ओळख ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून कायम रहावी*
यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह म्हणाले, नाशिक शहरला पौराणिक व ऐतिहासिक वारसा असून दर 12 वर्षांनी येथे होणाऱ्या कुंभमेळा जागतिक स्तरावर अधोरेखित आहे. पुर्वीपेक्षा अधिक गर्दी नाशिक शहरात वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असून नाशिकची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून कायम ठेवल्यास निश्चितच पर्यावरणाचेही संरक्षण होईल यात शंका नाही असे मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी मांडले. जिल्ह्यातील वनसृष्टी ही नद्यांची माता आहे या जंगलांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनस्तरावर जंगलाच्या सीमा निश्चित झाल्यास परिणामी अतिक्रमण व जंगलतोड थांबण्यास मदत होणार आहे. ब्रम्हगिरी पर्वतावर खुप कुंडे आहेत त्यांचे पुनरूज्जीवन केल्यास नद्यांची पाणीपातळी उगमस्थापासून वाढली जाईल. आगामी कुंभमेळा लक्षात घेता नदीत सोडले जाणारे सांडपाणीबाबत आतापासूनच आवश्यक उपायायोजनेची आखणी प्रशासनाकडून केली जावी अशी अपेक्षा जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यात्मिक गुरू श्री. एम म्हणाले की, सदस्यांनी सुचविलेल्या सुचनांवर अंमलबजावणी व्हावी. तसेच नदी प्रदुषण रोखणे व आगामी कुंभ प्लॉस्टिकमुक्त होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपवनसंरक्षक श्री. गर्ग यांनी ‘चला जाणूया नदीला’ या मोहीमेबाबत समितीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या.
Leave a Reply