ग्रामीण बातम्या : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून बारा हजारांहून अधिक कर्जे मंजूर राज्यात हजारो नवे रोजगार निर्माण होणार.
मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून राज्यात बारा हजारहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत. या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यभर दौरे करून या योजनेतील अधिकाधिक प्रकरणे मंजूर करण्याबाबत बँकांना निर्देश दिले होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत या आर्थिक वर्षात एकूण १२ हजार ३२६ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून २७६ कोटीचे अनुदान दिले आहे. राज्याची ही कामगिरी मागील वर्षापेक्षा अधिक आहे. यात ५० टक्के महिला व २० टक्के मागासवर्गीय उद्योग घटकांचा समावेश आहे. मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये ५ हजार ५९६ घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून ६ हजार ७३१ घटक हे सेवा क्षेत्रातील आहेत.
वरील कर्ज प्रकरणांमधून सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार असून राज्यातील रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या योजने अंतर्गत राज्यात १०० टक्केपेक्षा अधिकची लक्षांक पूर्ती करुन धाराशिव १०८ टक्के अकोला १०७, अमरावती १०५, यवतमाळ १०४ या जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मागील आर्थिक वर्षात सुमारे ५ हजार ५६ कर्ज प्रकरणांना बँकेने मंजुरी दिली होती. त्यापैकी २ हजार ८२० लाभार्थ्यांना १०३ कोटी रुपयांचे अनुदान वाटप केले होते. यातून सुमारे ४० हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी ५५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेसाठी कर्जाची हमी राज्य शासनाने घेतली असल्याने अधिकाधिक तरुण- तरुणींना या योजनेचा लाभ मिळत आहे.
हेही वाचा 👇🏻👇🏻
Leave a Reply