१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत. हृदय, न्यूरो, क्वाक्लिअर इंप्लान्ट आदी शस्त्रक्रियांचा समावेश.
१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत. : शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे. यामुळे बालकांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना नाही.
या करारानुसार शून्य ते १८ वयोगटातील बालकांसाठी नन्हे येथील काशीबाई हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोग (कंजेनायटल हर्ट डिसिज), अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी), प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी), कानाचे उपचार (इएनटी) आणि डोळ्यांचे उपचार (आप्योल्मालॉजी) मोफत होणार आहेत.
आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्येही प्लास्टिक सर्जरी (फाटलेली दुभंगलेली टाळू). हृदयशल्यचिकित्सा, अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी), मेंदुची शस्त्रक्रिया (न्युरो सर्जरी), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी), ऐकू येण्यासाठी क्वाक्लिअर नवले इंप्लांट आणि डोळ्यांचे उपचार (आप्याल्मालॉजी) हे उपचार होणार आहेत. हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आरबीएसकेने ठरवलेल्या दरांनुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचा करार २३ मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. रघुनाथ भोये यांनी केला आहे.
कोठे कराल संपर्क?
यासाठी तुमच्या येथील आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी.
कोण आहे पात्र?
या उपचारांसाठी शून्य ते १८ वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत. त्यासाठी त्या बालकाचा शाळा शिकत असलेला अंगणवाडी किंवा शाळेचा दाखला, डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची मंजुरी ही कागदपत्रे लागतील.
मुंबईतही होणार उपचार
पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आले आहेत. तेथेही उपचार होतील. नाशिक येथे सुयोग हॉस्पिटल व चोपड़ा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील, तर इतर हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे हृदयरोगासह इतरही उपचार होतील.